राज्याला वीज पुरवणारे कोयनानगर अंधारात, दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 14:50 IST2025-08-22T14:50:10+5:302025-08-22T14:50:35+5:30
कोयनानगर : राज्याला वीजपुरवठा करत असलेल्या कोयना जलविद्युत प्रकपाच्या कोयना धरणावरील काही भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ...

संग्रहित छाया
कोयनानगर : राज्याला वीजपुरवठा करत असलेल्या कोयना जलविद्युत प्रकपाच्या कोयना धरणावरील काही भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कोयनानगर गावाच्या काही भाग दोन दिवसांपासून अंधारात आहे. त्याचा तेथील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या परिसरातील पाणीपुरवठाही बंद झाला आहे. त्यामुळे अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री घाटमाथ्यावर गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. जवळपास शंभर टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या धरणातील पाण्यावर वीजपुरवठा होत असल्याने महाराष्ट्र प्रकाशमान होत आहे. मात्र, या परिसरातील नागरिकांना सध्या वेगळ्याच समस्यांनी ग्रासले आहे.
कोयनानगरला पोफळी वीजनिर्मिती प्रकल्पाकडून वीजपुरवठा केला जातो. त्यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याने विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे कोयनानगरमधील एका कॉलनीतील वीज गेलेली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेवरही परिणाम झालेला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न उद्भवणे ही गंभीर बाब आहे. मुलांना अंधारात अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे वीजपुरवठा व पाणी कधी पूर्ववत सुरू होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.