निवडणुकीची चार वर्षांची प्रतिक्षा संपली; सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका, एका नगरपंचायतीत सत्तासंघर्ष सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:16 IST2025-11-05T14:15:23+5:302025-11-05T14:16:14+5:30
Local Body Election: नऊ नगरपालिकांच्या २३३ नगरसेवकांचे भवितव्य ठरणार

निवडणुकीची चार वर्षांची प्रतिक्षा संपली; सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका, एका नगरपंचायतीत सत्तासंघर्ष सुरु
सातारा : राज्यासह सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची प्रतीक्षा आता संपुष्टात आली असून, राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी अंतिम निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीत आता सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे. नगरपालिकांच्या २३३ नगरसेवकांचे भवितव्य २ डिसेंबरच्या मतदानानंतर ठरणार आहे.
जिल्ह्यातील सातारा, कराड, मलकापूर, वाई, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, महाबळेश्वर व पाचगणी या पालिका, तर मेढा नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. या सर्व ठिकाणी नगराध्यक्ष व प्रभागांचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले असून, अंतिम मतदारयाद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. या निवडणुकीद्वारे एकूण ११५ प्रभागांमधून २३३ नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यामध्ये १३९ जागा सर्वसाधारण, ६० इतर मागास प्रवर्ग, ३२ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे.
राजकीय मोर्चेबांधणीला वेग
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत राज्यासह स्थानिक राजकारणात मोठा सत्तासंघर्ष झाला. राजकीय पक्षांची फाटाफूट झाली, कार्यकर्ते दुभंगले गेले. त्यामुळे यंदाची निवडणूक राजकीय नेते मंडळींसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई, मलकापूर या संवेदनशील पालिकांवर वर्चस्व मिळविण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीने जोरकस तयारी केली आहे. यंदादेखील लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्याने महायुती व महाविकास आघाडीकडून ‘सर्वोच्च’ पद ताब्यात घेण्यासाठी कोणती व्यूहरचना आखली जाते? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
...असे असेल गणित
- नगरपालिका : ९
- नगरपंचायत : १
- नगराध्यक्ष : १०
- एकूण प्रभाग : ११५
- पालिका नगरसेवक : २३३
- नगरपंचायत नगरसेवक : १७