सातारा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 12:34 PM2021-11-23T12:34:41+5:302021-11-23T12:35:53+5:30

सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलने २१ पैकी ...

Power of Nationalist Sponsored Co operative Panel over Satara District Bank | सातारा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलची सत्ता

सातारा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलची सत्ता

googlenewsNext

सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलने २१ पैकी १७ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी अकरा जागा यापूर्वीच सहकार पॅनलने बिनविरोध करत वर्चस्व मिळवले होते. उर्वरित दहा जागांसाठी रविवारी मतदान झाले. जिल्ह्यातील ११ तालुक्यामधून ९६ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जावळी, खटाव या दोन तालुक्यातून १०० टक्के मतदान झाले. बहुतांश तालुक्यांमधून ९० टक्‍क्‍यांच्यावर मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण १ हजार ९६४ मतदारांपैकी १ हजार ८९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी सातारा येथील नागरी बँक असोसिएशनच्या सभागृहामध्ये मतमोजणी पार पडली.

दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सहा जागा सहकार पॅनलला मिळाल्या. तर चार जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. कराड सोसायटी मतदार संघामध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा पराभव करत या मतदारसंघावर वर्चस्व मिळवले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण सोसायटी मतदारसंघातून नशीब आजमावले; परंतु त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यजीतसिंह पाटणकर यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे हेविवेट नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा अपक्ष उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी अवघ्या एका मताने पराभव केला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या खटाव आणि माण विकास सेवा सोसायटी निवडणुकीमध्ये सहकार पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. खटाव सोसायटी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारले होते. मात्र या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक नंदकुमार मोरे यांचा घार्गे यांनी दारुण पराभव केला. माण सोसायटी मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे शेखर गोरे यांनी विजय मिळवला. कोरेगाव सोसायटी मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे शिवाजीराव महाडिक यांचा पराभव करून सुनील खत्री विजयी झाले आहेत.

इतर इतर मागास प्रवर्ग मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व विद्यमान संचालक प्रदीप विधाते यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. नागरी बॅंका पतसंस्था मतदारसंघांमध्ये रामभाऊ लेंभे यांनीदेखील प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील जाधव यांचा पराभव केला. महिला राखीवच्या दोन जागांवर सहकार पॅनलने विजय मिळवला. या ठिकाणी कांचन साळुंखे आणि ऋतुजा पाटील यांनी विजय मिळवला आहे.

मतमोजणीनंतर राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक

जावळी सोसायटी मतदार संघाची मतमोजणी झाल्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी भावनावर दगडफेक केली. या दगडफेकीतबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. काही लोकांनी भावनेच्या भरात हे कृत्य केले आहे. माझा पराभव हा पक्षातीलच काही नेत्यांमुळे झाला. याबाबत दिनांक २५ नोव्हेंबर नंतर मत व्यक्त करेन, असे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.

शेखर गोरे, सुनील खत्री यांना चिठ्ठीने दिली साथ

माण सोसायटी मतदारसंघातून शेखर गोरे आणि मनोज पोळ यांना प्रत्येकी ३६ पडली होती. कोरेगाव सोसायटी मतदार संघामध्ये सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना प्रत्येकी ४५ मते पडली. दोन्ही ठिकाणी उमेदवारांना समसमान मते पडल्याने या मतदारसंघाचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. इतर सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थिनीच्या असते आणि निवडणूक प्रतिनिधींच्या उपस्थितीत दोन्ही मतदारसंघांमध्ये ईश्वर चिठ्ठी काढली. शिवसेनेचे शेखर गोरे आणि सुनील खत्री यांना या चिठ्ठीने साथ दिली आणि ते विजयी ठरले.

Web Title: Power of Nationalist Sponsored Co operative Panel over Satara District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.