शिवेंद्रसिंहराजेंनी मास भवनात सत्कार झालेले मुख्यमंत्री झाल्याची गुगली टाकली, उदय सामंतांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले..
By दीपक देशमुख | Updated: April 5, 2025 13:46 IST2025-04-05T13:45:46+5:302025-04-05T13:46:19+5:30
दीपक देशमुख सातारा : एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले अन् उदय सामंत हे दिग्गज मंत्री ...

शिवेंद्रसिंहराजेंनी मास भवनात सत्कार झालेले मुख्यमंत्री झाल्याची गुगली टाकली, उदय सामंतांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले..
दीपक देशमुख
सातारा : एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले अन् उदय सामंत हे दिग्गज मंत्री एकत्र आले. यावेळी त्यांच्यात दिलखुलास आतषबाजी रंगली. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मास भवनात ज्यांचा सत्कार झाला ते नारायण राणे, अशोक चव्हाण हे पुढे मुख्यमंत्री झाल्याची गुगली हळूच टाकली. यावर उदय सामंत यांनीही माझा करेक्ट कार्यक्रम करायचे ठरले काय, असे मिश्कीलपणे सांगत मीच शिवेंद्रसिंहराजेंना शुभेच्छा देतो की त्यांनी मोठ्या पदावर जावे, म्हणत चेंडू त्यांच्याच कोर्टात टोलविला.
सातारा येथे लोकार्पण सोहळ्यानंतर मास भवन सभागृहात उद्योजकांच्या मेळाव्यात दोन्ही मंत्री महोदयांनी एकमेकांची फिरकी घेतली. सुरुवातीला शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, राष्ट्रवादीतून मी आणि सामंत दोघेही आमदार झालो. पुढे सामंत यांनी वेगळा मार्ग धरला व शिवसेनेतून पुढे गेले. आम्ही मात्र राष्ट्रवादीत राहिलो अन् मागे पडलो. मात्र लगेच पुढे आमचे सरकार आले नाही म्हणून मागे पडलो, अशी पुस्तीही जोडली. मास भवन येथे यापूर्वी अशोक चव्हाण, नारायण राणे हे सत्कार घेऊन गेले. ते सर्व पुढे मुख्यमंत्री झाले. उदय सामंत तुम्हाला अडचणीत आणत नाही. पण, आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत, असे सांगत सामंत यांना चिमटा काढला.
सामंत यांनी आपल्या भाषणात हा धागा अचूक पकडला. सामंत मिश्कीलीने म्हणाले, आठ दिवसांपूर्वी ज्यावेळी मला उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं, त्यावेळीच माझा करेक्ट कार्यक्रम करण्याचं ठरलं होतं काय? मी राजकारणात पुढं जावं, अशी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका असली तरी माझ्या राजकीय मर्यादा मला माहीत आहेत. त्यामुळे मीच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शुभेच्छा देतो की, त्यांनी आहे त्यापेक्षा मोठ्या पदावर जावे, असे सांगत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा चेंडू त्यांच्याच कोर्टात टोलवला
दोन्ही राजेंशी सुरेख समन्वय..
आयटी पार्कसाठी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे या दोघांनीही दोन जागा सुचविल्या आहेत. याचा उल्लेख करीत मी सुरूची येथे सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनाही भेटून चर्चा केल्याचे सामंत यांनी सांगितले.
एका ठिकाणी आयटी पार्क सुरू होईल तर एका ठिकाणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी चर्चा करून कौशल्य विकास केंद्र सुरू करू, असे सांगत त्यांनी सुरेख समन्वयही साधला.
राजकीय गुगली..
मंत्री उदय सामंत व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनी जरी एकमेकांची फिरकी घेतली असली तरी त्या दोघांमधील जुनी मैत्री या निमित्ताने पहायला मिळला. त्यांच्या राजकीय गुगलीने हास्यतुषार उडाले.