Local Body Election: सातारा, कराडच्या महायुद्धात १८ उमेदवारांची परीक्षा!, पक्षश्रेष्ठींची राजकीय प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:40 IST2025-11-25T19:37:19+5:302025-11-25T19:40:14+5:30
दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी प्रत्येक नऊ उमेदवारांमध्ये लढत

Local Body Election: सातारा, कराडच्या महायुद्धात १८ उमेदवारांची परीक्षा!, पक्षश्रेष्ठींची राजकीय प्रतिष्ठा पणाला
सातारा : राज्याच्या राजकारणात नेहमीच संवेदनशील ठरलेल्या सातारा आणि कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी नगराध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेचा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी नऊ, असे तब्बल १८ उमेदवार रिंगणात उतरल्याने स्थानिक नेतृत्वासह पक्षश्रेष्ठींची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या साताऱ्यात यंदाची लढत अत्यंत लक्षवेधी ठरली आहे. ५० सदस्यांची ही पालिका शहराच्या वाढीव हद्दीपर्यंत विस्तारल्याने, लोकनियुक्त नगराध्यक्षाला विस्तारित भागाच्या नेतृत्वाची मोठी संधी मिळणार आहे. येथील नगराध्यक्षपदाचा सामना थेट भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा होणार आहे.
भाजपने माजी नगरसेवक अमोल मोहिते यांना संधी दिली आहे. त्यांच्यासमोर, भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलेल्या सुवर्णा पाटील यांनी महाविकास आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. या दोन राजकीय दिग्गजांच्या मुख्य लढतीमुळे साताऱ्याचा गड कोणाच्या ताब्यात जाणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अन्य अपक्ष उमेदवारांमुळे ही लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
कराड पालिकेत काटे की टक्कर !
कराड नगरपालिकेत यंदाची निवडणूक भाजप, काँग्रेस व दोन स्थानिक आघाड्यांमध्ये होणार आहे. येथे यशवंत आघाडीचे राजेंद्र यादव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. भाजपने विनायक पावसकर यांना, तर काँग्रेसने झाकीर पठाण यांना उमेदवारी दिली आहे. अपक्ष उमेदवार रणजित पाटील यांनीदेखील रिंगणात उतरवून ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले आहे. अनेक ताकदवर उमेदवार एकमेकांपुढे उभे ठाकल्याने, कराडच्या नेत्यांसाठी ही निवडणूक वर्चस्वाची लढाई बनली आहे. सत्तास्थापनेच्या निर्धाराने नेतेमंडळींनी प्रचारयंत्रणा कामाला लावली असली तरी निकालावरून नेतृत्वाचा प्रभाव सिद्ध होणार आहे.
रहिमतपूर-फलटणला घमासान !
जिल्ह्यातील रहिमतपूर व फलटण नगरपालिकेत दोन-दोन उमेदवार समोरासमोर असल्याने येथे कडवी-झुंज पाहायला मिळणार आहे. फलटणमध्ये शिंदेसेनेकडून अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, तर भाजपकडून समशेरसिंह नाईक-निंबाळकर एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. रहिमतपुरात राष्ट्रवादीकडून नंदना सुनील माने, तर भाजपकडून वैशाली नीलेश माने यांना उमेदवारी देण्यात आली असून, येथे महायुतीअंतर्गत लढत होणार आहे. या दोन्ही पालिकांच्या निकालावर बरीच राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.