Satara News: गव्याच्या हल्ल्यात पोलिस पाटील गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 19:15 IST2023-08-07T19:00:37+5:302023-08-07T19:15:28+5:30
तालुक्यात वन्यप्राण्याचे हल्ले वारंवार घडत असल्याने याठिकाणी 108 रुग्णवाहिका यंत्रणेसह सज्ज असण्याची गरज

Satara News: गव्याच्या हल्ल्यात पोलिस पाटील गंभीर जखमी
निलेश साळुंखे
कोयनानगर: पाटण तालुक्यातील पाथरपुंज गावातील प्रकाश चंद्रकांत चाळके (वय 39) हे शेतात जात असताना गव्याने हल्ला केला. यामध्ये चाळके गंभीर जखमी झाले. पाटणमधील ग्रामीण रूग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कराडला हलविण्यात आले.
हेळवाक वन्यजीव विभागाच्या हद्दीतील दुर्गम पाथरपुज गावचे पोलीस पाटील प्रकाश चाळके काल, रविवारी शेतात जात असताना अचानक गव्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रकाश यांच्या छातीत शिंग घुसल्याने खोलवर जखमा झाल्या. ग्रामस्थानी हेळवाक वन्यजीव विभागास घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी वनरक्षक एस. एस. दापके व कर्मचारी घटनास्थळी आले असता वाहनाची सोय नसल्याने तात्काळ पाटण येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले. यानंतर पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराडला हलविण्यात आले. दोन तीन दिवसापूर्वी याच भागातील गोठणे गावातील युवकावर गव्याने हल्ला केला होता. दुर्गम डोंगरी तालुक्यात वन्यप्राण्याचे हल्ले, सर्प व विंचुदंशाच्या घटना वारंवार घडत असल्याने याठिकाणी 108 रुग्णवाहिका यंत्रणेसह सज्ज असण्याची गरज आहे.