दहिवडी : गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील योगेश सुरेश पवार (वय २८) या तरुणाचा प्रेम संबंधातून धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी मायलेकीला ताब्यात घेतले असून, एकूण सातजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तेजस पवार (वय ३२, रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण) यांनी आपला भाऊ योगेश पवार हा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दहिवडी पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा दहिवडी पोलिस तपास करत असताना योगेश पवार याचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याचा मृतदेह नातेपुतेजवळील कालव्यामध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत दि. २२ रोजी आढळून आला.माण तालुक्यातील एका गावातील तरुणीसोबत योगेश याचे प्रेम संबंध होते. दि. १८ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास योगेश याला संबंधित तरुणीने ‘मला तुला भेटायचे आहे. आम्ही हातउसने घेतलेले पैसे पण तुला परत देतो’, असे फोनवरून सांगून योगेश याला बोलावून घेतले. त्यानंतर तिने व तिची आई तसेच इतर साथीदारांनी प्रेम संबंधातून तसेच हातउसने घेतलेल्या पैशाच्या कारणावरून खुनाचा कट रचला. धारदार शस्त्राने योगेशचा खून केला.त्यानंतर त्याच्याच कारमध्ये हातपाय बांधून पाठीमागे सीटवर त्याचा मृतदेह ठेवला. कारसह त्याचा मृतदेह नातेपुतेजवळील फडतरी रस्त्यालगत असलेल्या कॅनाॅलमध्ये टाकून दिला. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित मायलेकीला ताब्यात घेतले असून, इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, महिला पोलिस उपनिरीक्षक चांदणी मोटे या अधिक तपास करीत आहेत.
Satara Crime: भेटायला म्हणून बोलावून घेतले; गोंदवलेतील युवकाचा प्रेम संबंधातून निर्घृण खून, मायलेकी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:17 IST