पोलीस ठाण्यात शिरला साप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2015 20:55 IST2015-08-20T20:55:11+5:302015-08-20T20:55:11+5:30

वाई : नागपंचमी दिवशी तक्रार दाखल कराय तर नाही ना आला ?

Police has entered the serpent! | पोलीस ठाण्यात शिरला साप!

पोलीस ठाण्यात शिरला साप!

पांडुरंग भिलारे- वाई शहरात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.़ या शहरातीलच पोलीस ठाण्यात नागपंचमीच्या दिवशी चक्क धामणने दर्शन दिले. त्यावेळी धामणला पाहून अनेकांना काय बोलावे ते सुचेना. शेवटी धामणला पकडून बाहेर सोडून द्यायचा निर्णय झाला. यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये नागपंचमीच्या मुहूर्तावर साप आपल्या व्यथा मांडण्यासाठी तर पोलीस ठाण्यात आला नाही ना ? अशी कुजबूज सुरू होती.
वाई शहरास ऐतिहासिक, सांस्कृतिक असा अनेक शतकांचा वारसा आहे. आध्यात्मिक महत्त्व असल्यामुळे वाई शहराला दक्षिण काशीही समजले जाते़ त्यामुळे वर्षातील प्रत्येक सण अनोख्या पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो़ तसेच येथे नागपंचमीचाही सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. येथील कृष्णा नदीच्या जवळ असलेल्या नाग मंदिरात महिला वर्ग जमतो. तसेच वाई शहरातील किसन वीर चौकात ते येत असतात़ येथे अनेक विक्रेते विविध प्रकारची खेळणी, फुगे, सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी घेऊन येत असतात. त्यामुळे वाईच्या मुख्य चौकास यात्रेचे स्वरूप आलेले असते़ येथे पोलीस प्रशासनाला मोठा बंदोबस्त ठेवावा लागत असतो़ दरम्यान, अशातच दि. १९ रोजी नागपंचमीच्या दिवशी वाई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पोलीस ठाण्यात सायंकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ होती. त्याचवेळी धामण जातीचा साप दिसल्याने सर्वांचीच भंबेरी उडाली. सर्वत्र एकच पळापळ झाली़
साप सुद्धा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे़ हे महत्त्व ओळखून सापाला न मारता पकडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर सर्पमित्राचा मोबाईल नंबर शोधण्यासाठी सर्वांची लगबग सुरू झाली़ सर्प मित्र येण्यास तब्बल पाऊण तास लागला. तोपर्यंत त्या धामणवर लक्ष ठेवण्याची ड्यूटी पोलिसांवर आली होती.
यावेळी पोलीस ठाण्यातील हवालदार शेंडगे हे सापावर लक्ष ठेवून होते़ यावेळी कामानिमित्त आलेल्या अनेक लोकांनी धामण पाहण्यासाठी गर्दी केली होती़ सर्पमित्र अजिज शेख यांनी पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर सापास पकडले, त्याला जवळच असलेल्या वाई-पाचगणी जंगलात सोडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी हवालदार सी़ एन. शेडगे, पी़ डी़ शिंदे, ए. जी. कुंभार, सी़ ए. जाधव, गरूड, धायगुडे उपस्थित होते.


पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करावा

सध्याच्या स्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे. माणसाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याने वन्यजीवांना मनुष्य वस्तीत वास्तव्य करण्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे कधी साप तर कधी बिबट्या मनुष्य वस्तीत आल्याच्या बातम्या येत असतात. माणसाने पर्यावरण संवर्धन टिकविण्याची गरज आहे. तरच पर्यावरण संवर्धन होईल़
- विजय लष्करे, व्यावसायिक वाई

सर्पमित्राची घ्यावी मदत
सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. साप दिसला की, टाक धोपाटी ही रुढ आपल्यामध्ये आहे़ त्याला फाटा देऊन रहिवासी वस्तीत कोठे साप आढळल्यास नागरिकांनी सर्पमित्रास बोलवावे. म्हणजे त्याचा जीव वाचेल़

सापावर लक्ष ठेवण्याची बजावली ड्यूटी
वाई पोलीस ठाण्यात साप दिसल्यानंतर पोलिसांसह सर्वचजण अवाक् झाले. सर्पमित्राचा फोन नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क करून तो ठाण्यात येईपर्यंत थोडावेळ लागणार होता. त्यामुळे नेहमी बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांना सापावर लक्ष ठेवण्याची ड्यूटी करावी लागली. सर्पमित्र अजिज शेख आल्यानंतर पोलिसांची ही ड्यूटी संपली.

Web Title: Police has entered the serpent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.