पुणे-बेंगलोर महामार्गालगतच्या डोंगरभिंतींना प्लास्टर, काम वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:30 IST2019-06-28T13:26:45+5:302019-06-28T13:30:42+5:30
पुणे-बेंगलोर महामार्गावर २४ जून रोजी झालेल्या जोरदार पावसात शेंद्रे येथे डोंगराचा भाग खचून दगड, मातीचा भाग सखल भागात साठला होता. याबाबत लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाने गुरुवारपासून डोंगराच्या भिंतींना शॉक्रिट (प्लास्टर)चे काम हाती घेतले.

पुणे-बेंगलोर महामार्गालगतच्या डोंगरभिंतींना प्लास्टर, काम वेगात
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर २४ जून रोजी झालेल्या जोरदार पावसात शेंद्रे येथे डोंगराचा भाग खचून दगड, मातीचा भाग सखल भागात साठला होता. याबाबत लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाने गुरुवारपासून डोंगराच्या भिंतींना शॉक्रिट (प्लास्टर)चे काम हाती घेतले.
पुणे-बेंगलोर महामार्गावर शेंद्रे येथे रविवारी (दि. २४) झालेल्या जोरदार पावसाने डोंगरावरील दगड, धोंडे, माती येऊन साठली. सखल भागात पाणी साठल्याने अपघाताची शक्यता होती; परंतु महामार्ग प्राधिकरणाने रात्री उशिरापर्यंत मोहीम राबवून माती, दगडांचा खच बाजूला केला.
खिंडवाडी ते शेंद्रे मार्गातील डोंगरात दगडखाणी आहेत. या खाणींकडे जाणारे रस्ते तीव्र उताराचे तसेच कच्चे आहेत. तसेच महामार्गावर डोंगराच्या बाजूला मोठी भिंत नसल्याने जोरात पाऊस कोसळला तर डोंगराचे दगड, मुरूम तसेच रस्त्याची माती वाहून उताराने थेट महामार्गावरील सखल भागात येऊन साठते. रविवारी पावसाच्या जोरदार प्रवाहाबरोबर डोंगरउतारावरून दगड, धोंडे, माती शेंद्रे, ता. सातारा येथील महामार्गावर साठून राहिली होती. साठलेले पाणी आणि त्यात दगड, धोंडे आणि मातीचा जागोजागी ढिगारा पडला होता.
दरम्यान, रुंदीकरण करत असताना महामार्गालगतच्या डोंगराचा भाग खचला आहे. त्यातच येथूनच खाणीकडे जाणाऱ्या वाटा तयार करण्यात आल्या आहेत. अनेकदा पाऊस पडल्यानंतर डोंगर खचून माती, दगड महामार्गावर कोसळतात. रविवारच्या पावसात असे दगड कोसळून ते सखल भागात साठल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. हे दगड वाहनांवर कोसळून जीविताचे नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने याठिकाणी असलेल्या डोंगराला प्लास्टर मारण्याचे काम सुरू केले आहे.
गुरुवारी खिंडवाडीत उतारालगत असणाऱ्या डोंगरावर हे काम सुरू होते. या कामासाठी मोठा जेसीबी वापरण्यात आला. डोंगराच्या भिंतीला कळकाचा मनोरा तयार केला होता. मशीनच्या साह्याने प्रेशरने डोंगरावर प्लास्टर मारण्याचे काम सुरू होते. यासाठी सिग्नल उभा करून महामार्गावरील वाहतूकही वळविण्यात आली होती.
वाहनांचा वेग कमी ठेवण्याच्या सूचना
खिंडवाडीत मुख्य महामार्ग तसेच सेवा रस्त्यालगतच्या पुलालाही प्लास्टर मारण्याचे काम सुरू आहे. यासाठी महामार्ग प्राधिकरणाने सिग्नल उभा केला आहे. मात्र, हे काम करत असताना वाहनांचा वेग असायला हवा. अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनधारकाने काळजी घ्यायला हवी, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.