लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गोडोली, कोडोली, शाहूनगर हा त्रिशंकू भाग अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. येथील रहिवासी आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने या भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु हद्दवाढीच्या वर्षपूर्तीनंतरही येथील कचरा संकलन व पथदिव्यांचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. आमचा कचरा दररोज संकलित व्हावा, रस्ते प्रकाशमान व्हावेत, अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.
सातारा शहराची हद्दवाढ न झाल्याने बाहेरील नागरिकांचा प्रचंड ताण सातारा पालिकेवर येत होता. शहरातील रस्ते, बाजारपेठा, मंडई, कचरा डेपो या सर्व सेवासुविधांचा उपभोग हद्दीबाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणात घेत होते. वाढीव लोकसंख्येचा शहरातील सेवा-सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेता सातारा शहराच्या हद्दवाढीवर तब्बल ४० वर्षांनंतर शिक्कामोर्तब करण्यात आले अन् अनेक वर्षे विकासापासून वंचित असलेला गोडोली, कोडोली, शाहूनगर हा त्रिशंकू भाग पालिकेत समाविष्ट झाला आहे.
हद्दवाढीनंतर पालिकेने येथील कचरा संकलनाचा प्रश्न प्राधान्याने हाती घेत घंडागाड्या सुरू केल्या; परंतु त्यामध्ये नियमितता नाही. प्रमुख मार्गावर पथदिवे बसवून अंधार दूर केला. मात्र, अंतर्गत रस्त्यांवरील अंधार अजूनही कायम आहे. पावसामुळे येथे रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले नाही. मात्र, डागडुजी करण्यात आली; परंतु पावसात रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे. पालिका मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. मोठी कामे टप्प्याटप्प्याने होतील; परंतु सध्याच्या घडीला कचऱ्याचे संकलन वेळेत व दररोज व्हायला हवे. या भागात पथदिवे उभारणे गरजेचे असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
(कोट)
त्रिशंकू भागाच्या विकासासाठी पालिकेने ५१ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. याशिवाय नगरोत्थान व दलितेतर योजनेतूनही कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे. पाइपड्रेन, गटर्स, रस्ते विकास, पथदिवे, खुल्या जागांचा विकास अशी कामे नियोजित असून, पुढील टप्प्यात ती प्राधान्याने हाती घेतली जातील.
- मनोज शेंडे, उपनगराध्यक्ष
(कोट)
त्रिशंकू भागात अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. घंटागाडी नियमित नसल्याने अनेक व्यापारी, दुकानदार, नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेने आरोग्य सेवेला बळकटी देण्याची खरी गरज आहे.
- ॲड. वैभव मोरे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
(चौकट)
नागरिकांच्या या आहेत अपेक्षा..
- प्रमुख व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण
- घंटागाड्या वेळेत व नियमित याव्यात
- सर्वत्र पथदिवे बसविण्यात यावेत
- सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुयारी गटार योजना
- ओढे, नाल्यांची स्वच्छता
- अतिक्रमण हटविण्याची गरज
- खुल्या जागांचा विकास, उद्यानाची निर्मिती
- सांस्कृतिक सभागृह, ज्येष्ठांना विरंगुळा केंद्र
लोगो : हद्दवाढीची वर्षपूर्ती : भाग ३