पाटणमधील उपविभागीय कार्यालय ‘नामधारी’!

By Admin | Updated: March 10, 2016 23:51 IST2016-03-10T22:32:47+5:302016-03-10T23:51:56+5:30

दोन्हींचा कार्यभार कऱ्हाडवर : पुन्हा ये रे माझ्या मागल्या; अधिकारी दीर्घ रजेवर

Pattan's Sub-Divisional Office 'Namdhari'! | पाटणमधील उपविभागीय कार्यालय ‘नामधारी’!

पाटणमधील उपविभागीय कार्यालय ‘नामधारी’!

पाटण : लोकसंख्येने आणि महसुली गावांमुळे मोठा तालुका म्हणून पाटणची ओळख. त्यातच दुर्गम, डोंगराळ, पवनचक्की प्रकल्प आणि कोयना धरण ही तालुक्याची आभूषणे. कोयना, मोरगिरी, ढेबेवाडी, पाटण, मल्हारपेठ, चाफळ, मारुल हवेली, तारळे अशा विभागांमध्ये विखुरलेल्या तालुक्यात उपविभागीय कार्यालये असावीत. लोकांना कऱ्हाडला हेलपाटे घालावे लागू नयेत म्हणून शासनाने पाटणला सोय केली. त्यासाठी अधिकारी धाडले; पण या दोन्ही कार्यालयांचे प्रमुख सतत रजेवर किंवा बदलीच्या प्रयत्नात असल्यामुळे मध्यंतरी प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस कार्यालये प्रमुख अधिकाऱ्याविना नामधारी बनली आहेत. अधिकारी रजेवर गेल्यामुळे या दोन्ही कार्यालयांचा कार्यभार नेहमीप्रमाणे कऱ्हाडवर आहे.
पाटण तालुक्यात २४१ गावे आणि ४४८ वाड्या-वस्त्या आहेत. गावांना महसुली सजा आणि मंडळांची संख्याही मोठी आहे. कोयना, ढेबेवाडी, पाटण येथे स्वतंत्र पोलीस ठाणी तर मल्हारपेठ, चाफळ, तारळे येथे पोलीस दूरक्षेत्रे आहेत. कोयना धरण सुरक्षितता आणि पवनचक्की आंदोलने, मारामाऱ्या आणि अपघात यासारख्या बाबींवर सातत्याने लक्ष ठेवावे लागते. त्यासाठी उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी ही पदे पाटण तालुक्यासाठी महत्त्वाची आहेत. मात्र अधिकाऱ्यांना करमेना अशी गत झाली आहे. सध्या दोन्ही अधिकारी वैद्यकीय रजेवर असतील मात्र यापूर्वीचा आढावा घेतल्यास उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांना पाटणचे हवामान मानवेना म्हणून की, काय सातत्याने अधिकारी रजेवर गेल्याचे रजिस्टरवरून दिसून येईल.(प्रतिनिधी)


लोकांना कऱ्हाडला हेलपाटे घालावे लागतात..
पाटणला उपविभागीय कार्यालये असली तरी त्यांचे प्रमुख किंवा कार्यभार कऱ्हाडच्या अधिकाऱ्यांकडे असल्यामुळे लोकांना तातडीचे दाखले परवाने किंवा पत्रासाठी कऱ्हाडला जावे लागत आहे. मग पाटणला कार्यालये असून काय कामाची? सहीसाठी कऱ्हाडला जावेच लागत आहे.
महत्त्वाचे अधिकारीच रजेवर असतील तर पाटणच्या कार्यालयांचा काय उपयोग लोकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करावा व गैरसोय टाळावी.
- महेंद्र तोडकर, पाटण

Web Title: Pattan's Sub-Divisional Office 'Namdhari'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.