Satara: पाचगणी पालिकेचा सोलर ट्री कोसळला!, निकृष्ट कामाचा नमुना चव्हाट्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:28 IST2025-06-18T16:28:17+5:302025-06-18T16:28:37+5:30

सहा महिन्यांत जमीनदोस्त

Panchgani Municipality's solar tree collapsed, Lakhs of rupees were wasted | Satara: पाचगणी पालिकेचा सोलर ट्री कोसळला!, निकृष्ट कामाचा नमुना चव्हाट्यावर 

Satara: पाचगणी पालिकेचा सोलर ट्री कोसळला!, निकृष्ट कामाचा नमुना चव्हाट्यावर 

पाचगणी : पाचगणी नगरपालिकेने सिडने पॉइंटवर सहा महिन्यांपूर्वी उभारलेला अत्याधुनिक ‘सोलर ट्री’ सोमवारी सोसाट्याच्या वाऱ्याने जमीनदोस्त झाला. हा सोलर ट्री पर्यटक नसताना कोसळल्यामुळे कसलीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र, यासाठी खर्च झालेले लाखो रुपये ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे पाण्यात गेल्याने पाचगणीकर नागरिक संतप्त झाले आहेत. या घटनेने पाचगणी नगरपालिकेच्या निकृष्ट विकासकामांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पाचगणी नगरपालिका हद्दीतील सर्व पर्यटन पॉइंट सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करीत असते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्व पॉइंटवर पर्यटकांच्या आकर्षणासाठी खेळणी बसवणे, पॅगोडा, झुलते पूल, गॅलरी अशा विविध कामांसाठी खर्च केला जातो. परंतु, या कामांना निकृष्टतेचा वास नेहमीच येत असतो. सोमवारच्या घटनेतील सोलर पॅनल ट्री याच कामाचा नमुना आहे. सहा महिन्यांपूर्वी सिडने पॉइंटवर एक व टेबल लँडवर एक असे दोन सोलर ट्री बसविले. हे काम ज्या ठेकेदाराने केले आहे ते पूर्णपणे निकृष्ट केले असल्याचे निदर्शनास येत आहे.

हे ट्री नेहमी जोरदार वारे असणाऱ्या पॉइंटवर बसवले आहेत, त्यामुळे त्यांचे फाउंडेशन दर्जेदार होणे गरजेचे होते. ते खोलवर व चांगल्या प्रतीचे केले नसल्याने हा ट्री पहिल्याच पावसाळ्यापूर्वी कोसळला. या ठिकाणी सर्व सोलर पॅनलचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी सर्वत्र काचांचा ढीग पडला आहे. यात वापरलेले साहित्य चांगल्या प्रतीचे नसल्यानेच हा ट्री कोसळला असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाचगणी नगरपालिकेने सिडनी पॉइंट येथे लाखो रुपये खर्च करून डिझाईनमध्ये, सोलर युनिट बसविले होते. त्या युनिटमध्ये थोडे आर्थिक वजन कमी पडल्यामुळे ते वाऱ्याच्या झोक्याने जमिनीवर कोसळले. नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्ची टाकायचे पण ठेकेदाराने आपल्या जास्तीतजास्त आर्थिक फायद्यासाठी निकृष्ट दर्जाची कामे करायची. या ठेकेदारावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.

पाचगणीत वारा सोसाट्याचा असतो. हे माहीत असताना सहा महिन्यांत हा ट्री कोसळल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशी कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. - दीपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
 

सिडने पॉइंट हा उंचावर असून, या ठिकाणी जोरदार वारे वाहत असतात. सध्या पाऊस सुरू असून, या ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत. या वाऱ्यामुळे हे युनिट कोसळले आहे. तरीसुद्धा आम्ही संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करणार आहोत. - निखिल जाधव, मुख्याधिकारी, पाचगणी

Web Title: Panchgani Municipality's solar tree collapsed, Lakhs of rupees were wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.