पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्या मृत्यूचे गूढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 21:15 IST2022-10-15T20:51:39+5:302022-10-15T21:15:19+5:30
राज्याचे पणन सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्या आत्महत्येचा गूढ अद्यापपर्यंत उकलले नाही.

पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्या मृत्यूचे गूढ कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरवळ: राज्याचे पणन सहकारी संस्थेचे सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्या आत्महत्येचा गूढ अद्यापपर्यंत उकलले नसून शिरवळ पोलिसांमार्फत युद्ध पातळीवर तपास सुरू आहे.
शिरवळ पोलिसांनी शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखीव ठेवला आहे. सहसंचालक शशिकांत घोरपडे हे शिदेंवाडी येथील एका कंपनीसमोरून बुधवार, दि. १२ ऑक्टोबरपासून बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांचे बंधू श्रीकांत घोरपडे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली होती.
शुक्रवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:५५ च्या दरम्यान एनडीआरएफ, महाबळेश्वर ट्रेकर्स जवानांना नीरा नदीपात्रात विरुद्ध दिशेला घटनास्थळापासून साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर आढळून आला होता. यावेळी शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, शवविच्छेदनानंतर शशिकांत घोरपडे यांचा व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला असून, रासायनिक तपासणीच्या उच्चस्तरीय तपासणीच्या अहवालानंतर पुढील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक नवनाथ मदने करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"