लॉकडाऊनमध्ये हरपले मैदानी खेळ ...: चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण, इनडोअर गेमवर समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 16:55 IST2020-05-24T16:32:38+5:302020-05-24T16:55:25+5:30
मैदानी खेळही मोबाईलवर खेळण्यात धन्यता मानली जात आहे. अशा वेळेला खंडाळा तालुक्यात मात्र मैदानावर मुले खेळताना पाहायला मिळत होती. भर उन्हाच्या तडाख्यातही क्रिकेटसारख्या खेळासाठी तरुणाई बेभान होताना दिसत होती.

लॉकडाऊनमध्ये हरपले मैदानी खेळ ...: चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण, इनडोअर गेमवर समाधान
खंडाळा : परिवर्तन हा काळाचा नियम आहे. आधुनिक युगात माणसाच्या जगण्याच्या संकल्पनाही बदलून गेल्या आहेत. संगणक आणि मोबाईल यंत्रणेमुळे तर आमूलाग्र बदल घडला आहे. तरीही उन्हाळ्याच्या सुटीत बालचमूंना मैदानी खेळाचा आनंद अधिक असतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या भयावह संकटामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे मुलांचे मैदानी खेळ हरपले आहेत. त्यामुळे चिमुकल्यांच्या आनंदावर विरजन पसरले आहे.
उन्हाळ्याची सुटी म्हणजे लहान मुलांसाठी मौजमजा असते. ना शाळा, ना अभ्यास, फक्त खेळ आणि आराम एवढंच काय ते काम असतं. अलीकडच्या काळात लहान वयापासूनच मोबाईलच्या युगात रमणारी पिढी दिसून येत आहे. मैदानी खेळही मोबाईलवर खेळण्यात धन्यता मानली जात आहे. अशा वेळेला खंडाळा तालुक्यात मात्र मैदानावर मुले खेळताना पाहायला मिळत होती. भर उन्हाच्या तडाख्यातही क्रिकेटसारख्या खेळासाठी तरुणाई बेभान होताना दिसत होती.
वास्तविक, शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानावरील खेळ हे उपयोगी पडत असतात; पण त्यासाठी वातावरणही पूरक असणे गरजेचे असते. अलीकडच्या काळात विटीदांडू, गोट्या, सूरपारंब्या यासारखे पारंपरिक खेळ नामशेष होत आहेत. अशा वेळी क्रिकेट, कबड्डी, खो-खो या खेळाच्या माध्यमातून मुले मैदानावर दिसून येत असतात. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे मुलांनाही घरातच बसावे लागले आहे. त्यामुळे मैदानी खेळाच्या जागी कॅरम, सापसीडी, बुद्धिबळ, चल्लसआठ सारखे इनडोअर खेळ खेळून दुधाची तहान ताकावर भागवली जात आहे.
मैदानावरील सांघिक खेळ ही मुलांच्या दृष्टीने चांगली बाब आहे. खेळातून शरीर सदृढ बनते, मुलांना विरंगुळा मिळतो; पण या महामारीच्या काळात सर्वांना घरीच अडकून पडावे लागले आहे. टीव्ही आणि मोबाईलचाही त्यांना कंटाळा येतो आहे, अशावेळी इनडोअर खेळात ते रमत आहेत. या रोगापासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
-सचिन राऊत, पालक