Satara: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी टोचले कार्यकर्त्यांचे कान, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:47 IST2025-11-03T18:46:57+5:302025-11-03T18:47:19+5:30
महाविकास आघाडी सरकारला थेट लक्ष्य केले

Satara: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी टोचले कार्यकर्त्यांचे कान, म्हणाले..
सातारा : ‘निवडणुकीची इच्छा व्यक्त करणे स्वाभाविक आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांनी केवळ इच्छा न बाळगता मतदारांचा कल जाणून घ्यावा आणि तयारी सुरू करावी. केवळ बिले काढणाऱ्यांनी आमच्यासोबत येऊच नये,’अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान टोचले.
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सोमवारी दुपारी साताऱ्यात आयोजित एका बैठकीत नगर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देतानाच आपली भूमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या न कोणत्या कारणाने लांबल्या असल्या तरी आता प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत पक्ष म्हणून लढायचे की अन्य पद्धतीने, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच घेतला जाईल.
नगरसेवकाच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, नगरसेवक हा जनतेची मोठी कामे करणारा असावा, केवळ घरासमोरील बारीक कामे करणारा नसावा. केवळ कामाची बिले काढणाऱ्यांनी आमच्या सोबत येऊच नये. निवडणुकीत अधिकृत एकच उमेदवार असतो, त्यामुळे ज्यांना कुणाला संधी मिळेल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे रहावे.
कोणत्याही प्रकारची रणनीती ठरविण्यासाठी अथवा एकट्याने ठोस भूमिका घेण्यासाठी ही बैठक बोलाविली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला माजी पक्षप्रतोद अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, धनंजय जांभळे, अविनाश कदम, दत्ताजी थोरात यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या काळात काम नाही...
राजकीय फटकेबाजी करताना शिवेंद्रसिंहराजे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला थेट लक्ष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या काळात कोणतेही ठोस काम झाले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे किमान त्या काळात सातारा शहराची हद्दवाढ होऊ शकली.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले..
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास असून त्यांच्याशी सल्लामसलत करूनच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय घेऊ
- या निवडणुकीत तरुण उमेदवारांना संधी दिली जाईल, परंतु जुन्या, अनुभवी कार्यकर्त्यांना डावलणार नाही
- भारतीय जनता पार्टी आणि आपल्यामध्ये नवीन-जुनं असं काहीही नाही. प्रत्येकाने एक दिलाने काम करावे
- जिल्हा परिषद आपल्या विचाराची करायची आहे. आपल्याला सर्व जाती-धर्माचे उमेदवार निवडून आणायचे आहेत.
- ८४ एकर क्षेत्रावर नवीन आयटी पार्क उभे राहणार असून, त्याची अधिसूचना लवकरच निघेल