एकाचा ‘डंका’; पण नऊ शाळांचे काय ?
By Admin | Updated: October 12, 2015 00:35 IST2015-10-11T22:06:31+5:302015-10-12T00:35:12+5:30
‘आयएसओ’ म्हंजी काय ओ गुरुजी ? : कऱ्हाड पालिकेच्या शाळा क्रमांक तीनचा राज्यभर लौकिक; उर्वरित शाळांची गुणवत्ता वाढविणार कोण ?--पालिकेची ‘शाळा’- एक

एकाचा ‘डंका’; पण नऊ शाळांचे काय ?
प्रमोद सुकरे- कऱ्हाड--येथील नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक तीनला नुकताच ‘आयएसओ’ मानांकनाचा दर्जा मिळाला. ‘विद्यानगरी’ म्हणून परिचित असणाऱ्या कऱ्हाडच्या लौकिकात त्यामुळे भरच पडली. या शाळेच्या गुणवत्तेची चर्चा सध्या जिल्ह्याबाहेरही सुरू झालेय; पण पालिकेच्या शहरातील इतर नऊ शाळांच्या गुणवत्तेचे काय? याची चर्चा आता कऱ्हाडात जोर धरू लागली आहे. याचे उत्तर पालिका प्रशासनाला द्यावेच लागेल. नगरपरिषद व महापालिका कार्यक्षेत्रात ‘आयएसओ’ मानांकनाचा दर्जा मिळविणारी कऱ्हाड नगरपरिषदेची शाळा क्रमांक तीन ही राज्यात पहिली शाळा ठरली आहे. शिक्षणाच्या खासगीकरणामुळे एका बाजूला जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळांना घरघर लागली असताना येथील एक शाळा ‘आयएसओ’पर्यंत मजल मारते यातून बोध घेणे गरजेचे आहे. येथील शिक्षकांनी काही जादूची कांडी फिरवली अन् चमत्कार घडला, असा प्रकार नाही. त्यांनी ज्या पद्धतीचे प्रयत्न केले; तोच कित्ता इतर शाळांच्या शिक्षकांनीही गिरविण्याची गरज आहे. शाळा क्रमांक तीन ही उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या प्रभागातील शाळा आहे. त्यांनी या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्याला मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांची मोलाची साथ मिळाली. तेथील सर्व शिक्षकांनीही स्वत:ला झोकून दिले तेव्हा कुठे त्यांना हे यश मिळाले. आता त्यात सातत्य ठेवण्याचे साऱ्यांसमोर आव्हान आहे.
पण, याउलट पालिकेच्या इतर नऊ शाळांचा आढावा घेतला तर त्यांचे मूल्यांकन नेमके कसे करायचे ? हा प्रश्न कऱ्हाडकर नागरिकांना पडला आहे.
खरंतर ‘आयएसओ’ दर्जा मिळाल्यानंतर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक शाळांचे शिक्षक, ग्रामशिक्षण समित्या या शाळांना भेट देऊन यातून आपल्याला काय घेता येईल का? याचा शोध घेऊ लागले आहेत. पण, कऱ्हाड नगरपरिषदेच्या इतर शाळेतील शिक्षक या शाळेतील वेगळेपण शोधून आपल्या शाळेत राबविण्यासाठी कधी वेळ काढणार? हा खरा प्रश्न आहे.
शाळा क्रमांक तीनची विद्यार्थिसंख्या ५०४ आहे. कऱ्हाड शहराबरोबरच नजीकच्या २० गावांतील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात. त्यासाठी २२ खासगी स्कूलबसही उपलब्ध आहेत. मात्र उरलेल्या नऊ शाळांपैकी पाच शाळांना विद्यार्थीसंख्या शंभरवरही नेता आलेली नाही. याचं कारण कोण शोधणार? पालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आहे.
...तर सर्वच शाळा आयएसओ मानांकित...
शाळा क्रमांक तीनला ‘आयएसओ’ मानांकन मिळविण्यात उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचा हा आदर्श इतर नगरसेवकांनी डोळ्यांसमोर ठेवून आपापल्या प्रभागातील शाळा दत्तक घेतल्या तर इतर नऊ शाळांही गुणवत्तेचा दर्जा सुधारून ‘आयएसओ’ मानांकित होतील यात शंका नाही.
पालिका शाळांच्या शिक्षकांनीच फिरवली कार्यक्रमाकडे पाठ
‘आयएसओ’ मानांकन प्रदान कार्यक्रमासाठी शाळा नं. तीनमध्ये अनेक मान्यवरांसह पालकांनी हजेरी लावली. नगरपरिषदेच्या इतर शाळेतील शिक्षकांनाही याचे नियंत्रण दिले होते. मात्र, बहुतांशी शिक्षकांनी याकडे पाठ फिरविणेच पसंत केले. याचे कारण काय? याची चर्चाही सुरू आहे.
नगरपरिषद शाळा क्रमांक, पटसंख्या अंदाजे व शिक्षक संख्या पुढीलप्रमाणे
शाळा क्रमांक १ - एकूण विद्यार्थी २२ - शिक्षक २, शाळा क्रमांक २ - विद्यार्थी ८५ - शिक्षक ३, शाळा क्रमांक ३ - विद्यार्थी ५०४ - शिक्षक ९, शाळा क्रमांक ४ - विद्यार्थी २८ - शिक्षक २, शाळा क्रमांक ५ - विद्यार्थी २८० - शिक्षक ८, शाळा क्रमांक ७ - विद्यार्थी २४० - शिक्षक ८, शाळा क्रमांक ९ - विद्यार्थी २९० - शिक्षक ८, शाळा क्रमांक १० - विद्यार्थी ६४ - शिक्षक २, शाळा क्रमांक ११ - विद्यार्थी २४ - शिक्षक २, शाळा क्रमांक १२ - विद्यार्थी १२५ - शिक्षक ४.
दोन शाळा यापूर्वीच बंद...
नगरपालिकेची शाळा क्रमांक ६ सुमारे १५ वर्षांपूर्वीच बंद पडली आहे. तर शाळा क्रमांक ८ सुमारे सात वर्षांपूर्वी बंद पडली आहे. त्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कसोशीचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकवेळ ते जमले नाही तरी चालेल; पण आणखी एखादी शाळा बंद पडू नये म्हणून काळजी घ्यायला हवी.
शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी शिक्षण मंडळे अस्तित्वात होती. सध्या ती बरखास्त आहे. मात्र त्यावेळी निवड झालेले सभापती आजही कायम आहेत म्हणे. त्यांच्या सहीनेच बराच कारभार चालतो. त्यांनीही यात लक्ष घातले तर बरे होईल.