मलकापुरात भरदिवसा तरुणावर धारदार शस्त्राने वार, एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 13:29 IST2021-12-15T12:15:46+5:302021-12-15T13:29:18+5:30
भरदिवसा व शहरातील मुख्य चौकात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

मलकापुरात भरदिवसा तरुणावर धारदार शस्त्राने वार, एक जण जखमी
मलकापूर : लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार ते पाच जणांनी एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात विश्वास हणमंत येडगे (वय २९, रा. मलकापूर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मलकापूर फाटा तालुका कराड येथे ही घटना घडली.
भरदिवसा व शहरातील मुख्य चौकात घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांनी विशाल येडगे यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने विशाल येडगे यांच्या पोटावर व शरीरावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यामध्ये विशाल मलकापूर फाटा येथे भररस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
दरम्यान घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी जखमी विशाल घाडगे यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.