उन्हाळ्यात दीडशे गावांना टंचाईच्या झळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST2021-01-20T04:38:34+5:302021-01-20T04:38:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्याच्या काळात अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे याबाबतचा संभाव्य पाणीटंचाई कृती ...

उन्हाळ्यात दीडशे गावांना टंचाईच्या झळा !
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्याच्या काळात अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे याबाबतचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. आताही आराखडा तयार करण्यात आला असून, जूनपर्यंत १३८ गावांना टंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज आहे. या टंचाई निवारणासाठी सुमारे साडेपाच कोटी खर्च येऊ शकतो.
सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून महिना असा दोन प्रकारांत संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात येतो. आताही हे दोन्ही आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत टंचाई भासणाऱ्या गावांची संख्या २०२ आणि वाड्यांचा आकडा १८२ निश्चित करण्यात आला आहे. अशा ठिकाणी विंधन विहीर घेणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती व इतर खर्च असा पाणीटंचाईवर अंदाजे तीन कोटी नऊ लाखांचा खर्च होऊ शकतो, तर या तीन महिन्यांत ४९ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. यासाठी १३ टँकर लागण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. या तीन महिन्यांत कोरेगाव, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यात टँकर सुरू करावे लागतील, असा अंदाज आहे.
एप्रिल ते जून या महिन्यांत कडक उन्हाळा असतो. त्यामुळे टंचाई भासणाऱ्या गावे आणि वाड्यांची संख्या वाढतच जाते. याचा विचार करून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या तीन महिन्यांत १६९ गावे आणि २२६ वाड्यांत टंचाई भासू शकते, असा निष्कर्ष काढला आहे, तर यामधील १३८ गावांना टंचाईचा सामना करावा लागेल. यासाठी ४६ टँकर लागू शकतात. टंचाई निवारणाची विविध कामे आणि टँकरवर अंदाजे दोन कोटी ४५ लाख खर्च येऊ शकतो, असे अंदाजे ठरविण्यात आले आहे.
चौकट :
माण, खटावमधील अधिक गावे टंचाईत...
माण आणि खटाव हे दोन तालुके दुष्काळी. या तालुक्यात सध्या काही योजनांचे पाणी आले आहे. त्यामुळे टंचाईची स्थिती कमी झाली आहे. असे असले तरी यावर्षी संभाव्य टंचाई आराखड्यात या दोन तालुक्यांतीलच गावे अधिक आहेत. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत माणमधील २२, तर खटाव तालुक्यातील २० गावांना टँकर सुरू करावा लागेल, असा अंदाज आहे. तर जावळी, फलटण, कोरेगाव, सातारा, वाई या तालुक्यांतही टँकर सुरू करावे लागणाऱ्या गावांची संख्या कमी राहील, असे अंदाजे निश्चित करण्यात आले आहे.
..........................................................