Satara: स्वातंत्र्य दिनानिमित्त कोयना धरण विद्युत रोषणाईने उजळून निघाले -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 13:06 IST2024-08-14T13:05:53+5:302024-08-14T13:06:33+5:30
कोयनानगर: स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण काल, मंगळवार (दि.१३) रात्रीपासुन विद्युत रोषणाई व प्रोजेक्टर माध्यमातुन तिरंग्यासह विविध विद्युत ...

Satara: स्वातंत्र्य दिनानिमित्त कोयना धरण विद्युत रोषणाईने उजळून निघाले -video
कोयनानगर: स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण काल, मंगळवार (दि.१३) रात्रीपासुन विद्युत रोषणाई व प्रोजेक्टर माध्यमातुन तिरंग्यासह विविध विद्युत दृश्याने उजळुन निघाले. हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमांतर्गत कोयना धरण व्यवस्थापनाने दि १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत ही विद्युत रोषणाई साकारली आहे. या रोषणाईचे व्हिडिओ, फोटोज सोशल मिडिया व्हायरल होताच परिसरातील नागरिकासह पर्यटकांची गर्दी होत आहे. धरणाच्या समोरील कोयना नदीवरील पुलावरून विद्युत रोषणाई पाहता येणार आहे.
कोयना धरण्याच्या सहा वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू केलेनंतर हे पाणी धरणाच्या भिंतीवरून फेसाळत कोयना नदीपात्रात जात असते.या फेसाळलेल्या पांढर्या शुभ्र पाण्यावर प्रोजेक्टरच्या माध्यमातुन तिरंगासह विविध स्वातंत्र्य दिनाची दृश्य साकारली आहेत. तसेच धरणाच्या भिंतीवर शार्पी लाईटचे प्रकाशझोत फिरत असलेनं किरणांच्या विविध छटा तयार होत आहेत. विद्युत रोषणाला संगीताची जोड दिल्याने देशभक्तीचा माहोल तयार होत आहे. ही डोळ्यांची पारणे फेडणारी रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांसह स्थानिकांची मोठी गर्दी होवू लागली आहे.
विद्युत रोषणाईमुळे कोयना धरणाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. विद्युत रोषणाईच्या दृश्याची चित्रफित कोयना धरण व्यवस्थापनाने समाज माध्यमांवर प्रदर्शित केली आहेत. त्याला मोठा प्रतिसाद मिळत हा सुखद अनुभव घेत या उपक्रमाचे लोकांकडून कौतुकही होत आहे. या अभिनव उपक्रमामध्ये प्रामुख्याने कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता नितिश पोतदार, उपअभियंता आशिष जाधव आदी अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.