झिजणाऱ्या मास्तरपुढं इथं ओशाळतोय खडू

By Admin | Updated: October 12, 2015 00:32 IST2015-10-11T22:02:08+5:302015-10-12T00:32:26+5:30

ज्ञानदानाव्यतिरिक्त भरमसाठ अशैक्षणिक कामांची जबाबदारी -शाळाबाह्य गुरुजी : एक

The ominous chalk in the back | झिजणाऱ्या मास्तरपुढं इथं ओशाळतोय खडू

झिजणाऱ्या मास्तरपुढं इथं ओशाळतोय खडू

प्रगती जाधव-पाटील ल्ल सातारा : ‘मास्तरांना काय काम असतं! फळ्यावर काळ्याचं पांढरं केलं की बास, मिळाला त्यांना पाच आकडी पगार. कशाची जबाबदारी आणि कशाची शिकवण! पूर्वीसारखं पोरांवर शिक्षकांचा दरारा नाही. कारण शिक्षक वर्गातच नसतात. हजेरी लावायचं अन् गुल्ल व्हायचं.’ या आणि अशा प्रकारच्या अनेक टिप्पणी ऐकायला मिळतात. पण शिक्षणाचे नेमून दिलेल्या कामापेक्षा अतिरिक्त जबाबदारीमुळे खचलेल्या शिक्षकाची भूमिका कोणीच समजून घेत नसल्याचे चित्र दिसते.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना मिळणारा पगार अनेकांच्या डोळ्यावर येतो. पण त्यासाठी केलेले कष्ट फारसे कोणाच्या स्मरणात राहत नाहीत. घरातून बाहेर काढून वर्गात मुलांना आणण्यापासून त्यांची सेवा या शिक्षकांना करावी लागते. बाल मानसशास्त्राचा अभ्यास असणाऱ्या या शिक्षकांना कायद्याचीही अनेक बंधने आहेत. शिक्षकांनी शांत डोक्याने मुलांना समजावून सांगावे अशी अपेक्षा असते. मुलांना शिक्षा दिली तर पालकांचा आकांडतांडव शिक्षकांच्या नोकरीवर गदा आणत आहे.
एकीकडे शाळेतच मुलांना विश्वातील सर्व ज्ञान मिळावे, अशी पालकांची भूमिका असते तर दुसरीकडे त्यांना कोणी बोट लावले नाही पाहिजे ही अपेक्षा असते. त्यामुळे अशैक्षणिक कामे, अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करण्याची कसरत एकाचवेळी शिक्षकांना करावी लागत आहे.


राज्य शासनाच्या नियमानुसार ज्या शाळांचा पट १५१ आहे अशाच शाळेला मुख्याध्यापक पद दिले जाते. खासगीकरण आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील मोहजालामुळे सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे अनेकांनी पाठ केली आहे. त्यामुळे या शाळेत सामाजातील आर्थिक दुर्बल आणि दुर्लक्षित घटकांतील मुलांची गर्दी असते. यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांना कित्येकदा किमान पटसंख्या भरेल इतकेही विद्यार्थी मिळत नाहीत. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थी शाळेत आणण्यासाठी अक्षरश: द्राविडी प्राणायाम करावे लागते. विद्यार्थ्यांना शाळेत आणणं, त्यांना खाऊ देणं ही सगळी कर्तव्य पार पाडावी लागतात. शिक्षकांना अध्ययन आणि व्यवस्थापन या दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात. एकच शिक्षक असल्यामुळे शिकवणं आणि सुट्टीच्या दिवशी शाळेचे दप्तर मांडण्यातच त्यांचा अधिकचा वेळ जातो.


शिकविण्याबरोबरच शिक्षकांची कर्तव्ये
शाळेत आवश्यक शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक नियंत्रण करणे
६ ते १४ वर्षे वयातील मुलांचा सर्वेक्षण करणे
शाळा परिसरातील मुला-मुलींची शंभर टक्के पटनोंदणी करणे
पालकांशी संपर्क ठेवून मुलांना शाळेकडे वळविण्यासाठी प्रयत्न करणे
वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी तरतूद करून काम करून घेणे
शालेय मालमत्तेची काळजी घेणे
शासकीय शालेय समितींवर नियंत्रण ठेवणे
वेळापत्रकानुसार शाळेचे कामकाज करणे
गटसंमेलन, विविध स्पर्धा, परीक्षांचे नियोजन करणे
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सवलती मिळण्यासाठी प्रयत्न करणे
विद्यार्थ्यांना शासकीय लाभासाठी प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करणे
पर्यावरण, मूल्यशिक्षण, लोकसंख्याविषयी जागृती निर्माण करणे.

Web Title: The ominous chalk in the back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.