मासेमारीसाठी गेलेल्या वृद्धाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 17:03 IST2021-06-04T17:02:06+5:302021-06-04T17:03:05+5:30
शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील गावडेवाडी रोडलगत असणाऱ्या चिरेबंदी ओढ्यात मासेमारी करण्याकरिता गेलेल्या कातकरी समाजातील वृद्धाचा विजेचा ...

मासेमारीसाठी गेलेल्या वृद्धाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील गावडेवाडी रोडलगत असणाऱ्या चिरेबंदी ओढ्यात मासेमारी करण्याकरिता गेलेल्या कातकरी समाजातील वृद्धाचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री सातच्या दरम्यान उघडकीस आली. काळू बारकू जाधव (वय ६०, रा. कातकरीवस्ती, पवारवस्तीलगत, शिरवळ, ता. खंडाळा) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ (ता. खंडाळा) येथील कातकरीवस्ती या ठिकाणी राहणारे काळू जाधव हे (पळशी, ता. खंडाळा) गावच्या हद्दीत असणाऱ्या चिरेबंदी ओढ्यात मासेमारी करण्याकरिता गेले होते.
दरम्यान, ते दुपारी उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांचे कुटुंबीय व मित्र हे शोध घेत होते. शिरवळ-पळशी रोडवरील गावडेवाडी रस्त्यावरील शेजारी असणाऱ्या चिरेबंदी ओढ्यामध्ये काळू जाधव हे निपचित पडल्याचे निदर्शनास आले. या वेळी कुटुंबीयांनी तत्काळ याबाबतची शिरवळ पोलीस स्टेशनला माहिती देताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जयवंत घोरपडे व कुटुंबीयांनी शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या वेळी मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची फिर्याद दगडू जाधव यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून, आकस्मिक मयत म्हणून नोंद झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई करीत आहेत.