प्रमोद सुकरे
कराड
कोरोनाच्या महामारी संकटामुळे कराडकर हैराण झाले आहेत. तालुक्यातील बाधितांचा आकडा बारा हजारांवर पोहोचला आहे. दररोज त्यात भरच पडत आहे, पण तालुक्यात ११ ठिकाणी रुग्णांसाठी सुमारे ८०० बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे बाधितांनी चिंता करण्याची गरज नाही, पण आपण बाधित होणार नाही याची काळजी इतरांनी घेण्याची गरज आहे.
कराड शहर जसे विद्येचे माहेरघर मानले जाते, तसेच वैद्यकीय क्षेत्रातही ते आघाडीवर आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा येथे मिळतात.
कोरोनाच्या महामारी संकटातही येथील रुग्णालये चांगले काम करताना दिसतात. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची देखील कराडवर चांगलीच मदार आहे. म्हणून तर कराडमधील रुग्णालयांना ते हक्काने बेड वाढविण्याच्या सूचना करताना दिसतात.
कराड शहर व तालुक्यातही रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील लक्षणे तीव्र नसणारे रुग्ण गृहविलगीकरणाचा पर्याय निवडताना दिसतात आणि लक्षणे जास्त असणारे रुग्ण कोविड सेंटर, हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. कराडला सातारा व सांगली जिल्ह्यांतून बाधित रुग्णांचा ताण मोठा पडत आहे. नाही तर कराड तालुक्यातील रुग्णांना येथे बेड कमी पडत नाहीत. सध्या कराडला बेड चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे बाधितांनी चिंता करायची गरज नाही, पण इतरांनी मात्र आपण बाधित होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज नक्कीच आहे.
चौकट
कराडमधील बेडची व्यवस्था
कृष्णा हॉस्पिटल २२५
सह्याद्री हॉस्पिटल १३०
क्रांती हॉस्पिटल ९
एरम हॉस्पिटल ४३
कराड हॉस्पिटल ४५
श्री हॉस्पिटल २९
राजश्री हॉस्पिटल २२
देसाई हॉस्पिटल २२
कोयना कोविड सेंटर २० उपजिल्हा रुग्णालय ५३
सह्याद्री कोविड सेंटर १५०
चौकट
मंगळवारपासून तीस वाढणार
येथील निरामय हॉस्पिटलमध्ये ३० ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली आहे. त्याबाबत परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मंगळवार दिनांक २० पासून येथे रुग्ण सेवा सुरू होणार आहे.
कोट
कोरोनाबाधित रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही. प्रशासन सर्व उपाययोजना करीत आहे. कराडमध्ये बेड कमी पडत नाहीत. येत्या आठ दिवसांत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह येथे ५० ऑक्सिजन बेडची सोय उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच वडगाव हवेली व उंडाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रत्येकी ३० ऑक्सिजन बेडची सोय लवकरच करण्यात येणार आहे.
उत्तमराव दिघे,
प्रांताधिकारी कराड.