कोयना धरणातील पाणीसाठ्यावर आताच विचार करण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:44 IST2021-08-20T04:44:56+5:302021-08-20T04:44:56+5:30
पाटण : पाटण तालुक्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात प्रचंड अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली. त्यामुळे ...

कोयना धरणातील पाणीसाठ्यावर आताच विचार करण्याची वेळ
पाटण : पाटण तालुक्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात प्रचंड अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली. त्यामुळे झालेले भयानक भूस्खलन याची झळ जनतेने सोसली आहे. यात अनेकांचे जीव गेले. आता याची पुनरावृत्ती होऊ नये असे सर्वांना वाटते. म्हणून कोयना धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक बनले आहे.
कोयना धरणात १९ ऑगस्टच्या सायंकाळी पाचच्या सुमारास ९२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच कोयना धरण ९८.९७ टक्के भरले आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. त्यापैकी पाच टीएमसी पाणी धरणातील गाळमिश्रित असते. ते उणे जाता कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता शंभर टीएमसी आहे.
त्यापैकी आता ९२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच कोयना धरणातील पाणीसाठ्याचे तातडीने नियोजन करणे आवश्यक आहे.
कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरावे म्हणजेच वर्षभराची चिंता मिटली असे सर्वांनाच वाटते, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर अजूनही पावसाचे दिवस शिल्लक आहेत. तसेच हवामान खात्याचा मोठी अतिवृष्टी होणार, असा अंदाज व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे कोयना धरणात झालेला ९२ टीएमसी पाणीसाठा पुन्हा संकट ओढवेल, अशीच भीती व्यक्त करण्यात येत आहे. अतिवृष्टी पुन्हा झाली तर धरण व्यवस्थापनाला नाइलाजाने कोयना धरणाचे दरवाजे उघडून आपत्कालीन परिस्थितीत पाणी सोडावे लागते आणि मग सांगलीपर्यंतच्या गावात पूर परिस्थिती निर्माण होते. तेव्हा आताच पावसाची उघडीप आहे तरच कोयना धरणातील पाणी काही प्रमाणात रिकामे करणे यावर विचार होणे आवश्यक आहे.
सध्याच्या परिस्थितीत कोयना धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या पायथा वीजग्रहातून केवळ २१०० क्यूसेक पाणी सोडले जाते. धरणाची जबाबदारी असणारे अभियंते कोयना धरणात जेवढे पाणी येते तेवढेच पायथा वीजगृहातून सोडत आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठा स्थिर राहत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ८ टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. ही गरज पाऊस थांबला तरी कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक यावर सहज पूर्ण होईल.
चौकट
पाच हजार मिलिमीटरचा आकडा गाठला नाही
कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथील पर्जन्यमापकावर पाच हजार मिलिमीटर पावसाची नोंद दरवर्षी होत असते. या वर्षी मोठ्या प्रमाणात ढगफुटी, अतिवृष्टी होऊनही तिन्ही ठिकाणी पाच हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा गाठलेला दिसत नाही.
कोट
हवामान अंदाजानुसार जिल्ह्याला सध्या तरी ग्रीन अलर्ट आहे. कोयना धरणात सध्या ९२ टीएमसी पाणीसाठा असला तरी धरणाच्या दरवाजातून पाणी सोडण्याचा सध्या तरी विचार नाही. पायथा वीजगृहातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले. कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे.
- नितेश पोतदार,
कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन मंडळ