भटके विमुक्त विकास संस्था संघर्षातून उभी राहिली, शरद पवार यांचं विधान
By सचिन काकडे | Updated: May 9, 2025 20:35 IST2025-05-09T20:35:12+5:302025-05-09T20:35:40+5:30
Sharad Pawar News: भटक्या विमुक्तांना शिक्षणाची द्वारे खुली झाली. त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव झाली. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय भटके विमुक्त व विकास संशोधन संस्थेचे योगदान मोलाचे आहे. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केलेल्या संघर्षातून ही संस्था उभी राहिली, असे मत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

भटके विमुक्त विकास संस्था संघर्षातून उभी राहिली, शरद पवार यांचं विधान
- सचिन काकडे
सातारा - एक काळ असा होता की भटक्या विमुक्तांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा होता. मात्र काळ बदलला तशी परिस्थिती बदलत गेली. भटक्या विमुक्तांना शिक्षणाची द्वारे खुली झाली. त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव झाली. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय भटके विमुक्त व विकास संशोधन संस्थेचे योगदान मोलाचे आहे. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केलेल्या संघर्षातून ही संस्था उभी राहिली, असे मत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था आणि फुले-आंबेडकर साहित्य पंचायत, सातारा यांच्या वतीने शुक्रवारी दुपारी जकातवाडी (सातारा) येथे शारदा आश्रमाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने, खासदार सुप्रिया सुळे, नारायण जावलीकर, रामभाऊ जाधव आदी उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले, लक्ष्मण माने यांनी पुरोगामी विचार रुजविण्यासाठी आयुष्याचा मोठा काळ खर्ची घालवला आहे. भटक्या विमुक्तांसाठी त्यांनी सुरू केलेल्या संस्थेला माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी प्रोत्साहन दिले. या संस्थेला पुढील काळातही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
लक्ष्मण माने म्हणाले, फुले-आंबेडकर विचारधारेला अनुसरून परिवर्तनाच्या चळवळीत योगदान देणारे लेखक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देण्याची परंपरा संस्थेने जपली आहे. ही संस्था शून्यातून उभी राहिली. संस्था उभी करण्यात शरद पवार यांचे योगदान अमूल्य आहे. संस्थेच्या छत्रछायेखाली आजवर ५० हजारांहून अधिक विद्यार्थी शिकून बाहेर पडले. शरद पवार यांनी आम्हाला इतकं भरभरून दिलं आहे की आता आम्हाला त्यांच्याकडून काहीही नको. श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू.
निधी कोणाच्या घरात जात नाही - सुप्रिया सुळे
जगात क्रांती होत आहे, नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. असे असताना आजही भटक्या विमुक्त समाजाला त्यांच्या अधिकारासाठी, शिक्षणासाठी लढावे लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैवी दुसरं काही नाही. आश्रमशाळांसाठी निधी का दिला जात नाही? हा पैसा कोणाच्या घरात जात नाही तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जातोय. याचा महाराष्ट्र सरकारने कुठेतरी विचार करायला हवा. ही वेळ सरकारवर टीका करण्याची नाही कारण आज देश अडचणीत आहे. जो सरकार निर्णय घेईल त्याच्या पाठीमागे आम्ही ताकदीने उभे राहू, असे मत यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
या मान्यवरांचा गौरव
यंदाचा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांना, वैचारिक चळवळीतील लेखक नारायण जावलीकर यांना यल्लाप्पा वैदू स्मृती युवा साहित्य पुरस्कार व भटक्या विमुक्त चळवळीत काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जाधव यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.