यापुढे लोकसभेपुरते नाही तर कायमस्वरुपी मनोमिलन; उदयनराजे भोसले यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

By दीपक शिंदे | Published: April 8, 2024 11:02 PM2024-04-08T23:02:36+5:302024-04-08T23:04:29+5:30

साताऱ्यात महायुतीचा मेळावा

No longer for the Lok Sabha, but a permanent union Udayanaraje Bhosale's testimony | यापुढे लोकसभेपुरते नाही तर कायमस्वरुपी मनोमिलन; उदयनराजे भोसले यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

यापुढे लोकसभेपुरते नाही तर कायमस्वरुपी मनोमिलन; उदयनराजे भोसले यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

दीपक देशमुख

सातारा : आजपर्यंत अनेक पंतप्रधानांनी केवळ घोषणाच दिल्या. परंतु, घोषणा देऊन गरिबी हटत नाही तर अंत:करणात तशी इच्छा असावी लागते. पर्याय नसल्याने तब्बल चाळीस वर्षे लोकांनी काँग्रेसला निवडून दिले, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. दरम्यान, यापुढे आमचे मनोमिलन केवळ आमदारकी आणि खासदारकीला नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये मनोमिलन असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सातारा येथे अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर आयोजित महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते.

पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, मनोज घोरपडे, वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे, चित्रलेखा कदम, सुनील खत्री, सौरभ शिंदे तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले, सुनील काटकर, अशोक माेने, वसंतराव मानकुमरे यांनी मनोमिलनाबाबत मत व्यक्त केले. ते सर्वांच्याच मनातले बोलले. जी अडचण शिवेंद्रसिंहराजेंची, तीच माझीसुद्धा आहे. कार्यकर्त्यांना जपावे लागते. इच्छुक जास्त व पदे कमी असतात. परंतु, यापुढे हे मनोमिलन कायम राहील व त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असेल. जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे, असा सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शंभूराज देसाई म्हणाले, २०१९ मध्ये महायुतीला कौल मनोमिलनला असतानाही राज्यात सरकार येऊ शकले नव्हते. ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासमवेत सत्ता स्थापन करायची वेळ आली. हे जनतेला पटणार नाही, हे आम्ही परोपरीने पक्षप्रमुखांना सांगितले. ठाकरे सरकार कोविडचे कारण सांगून अडीच वर्षे नुसते बसून होते, असा आरोप देसाई यांनी केला. यावेळी उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री फडणवीस तर वाढदिवशी मुख्यमंत्री शिंदे शुभेच्छा द्यायला येतात. अजित पवार यांचे नाव न घेता दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या तर तुम्हाला कायमच शुभेच्छा असतात, अशी कोपरखळी उदयनराजेंना देसाईंनी मारली.

अन् उदयराजेंना शपथ घ्यायला लावली

उदयनराजे भोसले यांनी मनोमिलनाबाबत वक्तव्य करताच उपस्थितांमधील एका कार्यकर्त्याने ओरडून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तसे सांगा, असे आवाहन केले. त्यानंतर उदयनराजे यांनी तो कार्यकर्ता योग्य तेच सांगतोय, असे सांगत मी मनापासून शपथ घेतोय की, मनोमिलन कायमस्वरुपी असेल. हे मी विसरणार नाही अन् तुम्ही सर्वांनी पक्ष लक्षात ठेवा, असा निश्चय बोलून दाखवला.

मोने, मानकुमरे यांची फटकेबाजी

मेळाव्याच्या प्रारंभी अशोक माेने आणि मानकुमरे यांची भाषणे झाली. मोने यांनी आमदारकी अन् खासदारकी आली की, तुमचे मनोमिलन होते. मग झप्प्या अन् पप्प्या सुरू होतात. एकदा निवडणूक झाली की आम्हाला कोण विचारत नाही. आमच्या वेळी मनोमिलन कोठे जाते, असा सवाल केला करत आम्ही तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहोत. मनोमिलन कायमस्वरुपी असावे, अशी मागणी केली. वसंतराव मानकुमरे आणि सुनील काटकर यांनीही हीच मागणी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हा धागा पकडून निवडणूक असो वा नसो, मी कधीही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही, असे सांगितले.

Web Title: No longer for the Lok Sabha, but a permanent union Udayanaraje Bhosale's testimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.