सातारा : दामदुप्पटच्या आमिषाने नऊ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी अनुराधा विशाल लोहार (रा. अंबेवाडी, ता. सातारा ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार धन्यकुमार गोरख माने, शरयू धन्यकुमार माने (रा. संगमनगर खेड, सातारा) आणि प्रतीक्षा सिद्धार्थ गडांकुश (रा. चिंचणेर, ता. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. गेल्यावर्षी २१ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर दरम्यान हा प्रकार सातारा शहरात घडला आहे. पोलिसांनी सांगितले की, संशयितांनी आमच्याकडील योजनेत पैसे गुंतवल्यास दुप्पट रक्कम किंवा त्या दुप्पट रकमेचे सोने मिळणार तसेच इतर आश्वासने दिली होती. अशाप्रकारे विश्वास संपादन करून तक्रारदार तसेच इतर लोकांकडून ९ लाख १० हजार रुपये घेतले. पण, परत ते दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
मारहाणीनंतर दुखापतीचा गुन्हा..अनुराधा लोहार यांनी आणखी एक तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार धन्यकुमार माने, शरयू माने यांच्याविरोधात दुखापतीचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, २० रोजी शहरातील एका हाॅटेलसमोर हा प्रकार घडला. तक्रारदाराने संशयितांकडे तुमच्याकडे गुंतवलेल्या पैशाचे काय झाले अशी विचारणा केली होती. याचा राग मनात धरून लोहार यांना मारहाण करण्यात आली. तसेच शिवीगाळ करत धमकीही देण्यात आली. या प्रकारानंतर लोहार यांनी तक्रार दिली. शहर ठाण्यात दोघांच्याविरोधात दुखापतीचा गुन्हा नोंद झाला आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.