‘अमृततुल्य’ उदंड... कऱ्हाडात ‘चहा’पेक्षा चक्क किटल्याच गरम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:44 IST2021-08-20T04:44:52+5:302021-08-20T04:44:52+5:30
कऱ्हाड : चहा इंग्रजांनी भारतात आणला. १९४७ साली इंग्रज भारत सोडूनही गेले; पण भारतीयांनी चहाला सोडले नाही. प्रत्येकाने चहा ...

‘अमृततुल्य’ उदंड... कऱ्हाडात ‘चहा’पेक्षा चक्क किटल्याच गरम!
कऱ्हाड : चहा इंग्रजांनी भारतात आणला. १९४७ साली इंग्रज भारत सोडूनही गेले; पण भारतीयांनी चहाला सोडले नाही. प्रत्येकाने चहा आपलासा केला. आतातर कऱ्हाडकरांनी त्याला चक्क ‘अमृततुल्य’च ठरवलंय. ‘चहापेक्षा किटली गरम’ असाच हा प्रकार असून ‘अमृततुल्य’ पिणारे कमी अन् विकणारे उदंड, अशी परिस्थिती आहे.
पाणी, पावडर, साखर आणि दुधाचे उकळलेले मिश्रण ही चहाची साधीसोपी व्याख्या; पण कऱ्हाडकरांनी चहाच्या पर्यायाचं एवढं मिश्रण केलय की, पिणाऱ्याला कोणता चहा निवडावा हेच ‘कन्फ्युजन’ होतेय. मोठमोठ्या हॉटेलमध्ये एकाच पदार्थाचे अनेक उपपदार्थ असतात. एखादा पदार्थ निवडला की वेटर त्याच पदार्थाचे अन्य पर्याय सांगतो. खाद्य पदार्थांमध्ये आपण हे समजू शकतो. पण कऱ्हाडात चहा प्यायला गेलं की चहावाला चहाचे आणखी काही पर्याय समोर ठेवतो. त्यामुळे ऐकणाराच संभ्रमात पडतो. इतर शहरात चहावाले आहेत. मात्र, कऱ्हाडातल्या चहावाल्यांची गोष्टच वेगळी.
काही वर्षांपूर्वी शहरातील ठरावीक चौकात टपरीवजा हातगाड्यांवर चहा बनवून विकला जायचा. त्यावेळी हा छोटेखानी व्यवसाय होता. मात्र, आता चहा हा चक्क ‘बिझनेस’ बनलाय. भाडेतत्त्वावरील गाळ्यांमध्ये आलिशान फर्निचर करून वेगवेगळ्या प्रकारचे चहा कऱ्हाडात विकले जातात. आणि पिणारेही हे वेगवेगळ्या प्रकारचे चहा आवडीने पितात.
- चौकट
चहा म्हणजे ‘अमृत’.. कसं काय?
कोल्हापूर नाका हे कऱ्हाडचे प्रवेशद्वार आणि या नाक्यापासूनच ‘अमृततुल्य’च्या पाट्या सुरू होतात. तेथून पोपटभाई पेट्रोल पंप चौक, शाहू चौक, दत्त चौकमार्गे विजय दिवस चौकातून कृष्णा नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच दत्त चौकातून आझाद चौकमार्गे चावडी चौक आणि तेथून कृष्णा नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर ‘अमृततुल्य’च्या अनेक पाट्या नजरेस पडतात. चहाच्या दुकानांची नावे वेगवेगळी; पण प्रत्येक पाटीवर चहासोबत ‘अमृततुल्य’ हमखास जोडलेलं दिसतं.
- चौकट
कऱ्हाडात मिळणारे चहा...
१) साधा चहा
२) स्पेशल चहा
३) टक्कर चहा
४) मारामारी चहा
५) आबा चहा
६) ब्लॅक टी
७) जिंजर टी
८) ग्रीन टी
९) मिल्क टी
१०) लेमन टी
११) बासुंदी चहा
१२) शुगर फ्री
१३) काढा चहा
- चौकट
चहाचे हातगाडे : २१०
चहा टपऱ्या : २३
चहा स्पेशल हॉटेल : १५
(पालिकेच्या नोंदीनुसार सुमारे)
- चौकट
५ ते ५० रुपयांपर्यंत कप
चहाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या किमती आहेत. साधा चहा पाच रुपयांना तर स्पेशल दहा रुपयाला सर्वत्र मिळतो. मात्र, टक्कर, आबा, मारामारी यासारख्या अफलातून चहाबरोबरच ग्रीन, मिल्क, लेमन अशा वेगवेगळ्या चहाच्या कपची किंमत पन्नास रुपयांपर्यंत आहे.
फोटो : १९केआरडी०२,०३
कॅप्शन : प्रतीकात्मक