एकमेका सहाय्य करू, अवघी टिकवू कारखानदारी!; 'सह्याद्री' नजीकच्या कारखानदारांची साथ 'बाळासाहेबां'च्या पथ्यावर

By प्रमोद सुकरे | Updated: April 9, 2025 12:07 IST2025-04-09T12:06:38+5:302025-04-09T12:07:13+5:30

प्रमोद सुकरे  कराड : खरंतर सहकारातील निवडणूका आणि इतर सार्वत्रिक निवडणुका या वेगवेगळ्या मानल्या जातात. सहकारात पक्षीय जोडे बाजूला ...

Nearby factory owners support Balasaheb Patil in Sahyadri Sugar Factory elections | एकमेका सहाय्य करू, अवघी टिकवू कारखानदारी!; 'सह्याद्री' नजीकच्या कारखानदारांची साथ 'बाळासाहेबां'च्या पथ्यावर

एकमेका सहाय्य करू, अवघी टिकवू कारखानदारी!; 'सह्याद्री' नजीकच्या कारखानदारांची साथ 'बाळासाहेबां'च्या पथ्यावर

प्रमोद सुकरे 

कराड : खरंतर सहकारातील निवडणूका आणि इतर सार्वत्रिक निवडणुका या वेगवेगळ्या मानल्या जातात. सहकारात पक्षीय जोडे बाजूला ठेवून निवडणूका होतात. त्याचेच प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या 'सह्याद्री'च्या निवडणुकीत आले. सह्याद्री साखर कारखान्याच्या भोवतालच्या इतर बहुसंख्य कारखानदारांनी पक्ष, झेंडे बाजूला ठेवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष 'एकमेका सहाय्य करू,अवघी टिकवू कारखानदारी!' म्हणत या निवडणुकीत सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्याच पनेलला मदत केली. ही त्यांची साथ बाळासाहेब पाटलांच्या पथ्यावर पडल्यानेच त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले. या लाटेत कराड उत्तरची जागा ही भाजपने मिळवली. मनोज घोरपडे आमदार झाले. त्यांनी तत्कालीन विद्यमान आमदार व 'सह्याद्री'चे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. साहजिकच त्यामुळे बाळासाहेब पाटील यांचे कार्यकर्ते अस्वस्थ दिसत होते. त्यातच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली.

या निवडणुकीसाठी विद्यमान आमदारांनी पुन्हा 'शड्डू' ठोकला. त्यामुळे आता या निवडणुकीत नेमके काय होणार? अशी कार्यकर्त्यांच्यात चर्चा सुरू झाली. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ अन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सुमारे ७५ टक्के कार्यक्षेत्र एकच असल्याने विरोधक तर पुन्हा परिवर्तनाचा विश्वास व्यक्त करीत होते.

निवडणूक जाहीर झाली. वातावरण भलतेच तापले. आरोप प्रत्यारोप सुरू झाले. पण त्याच दरम्यान विरोधकांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले अन त्यांचीच दोन पॅनेल रिंगणात उभी ठाकली. हीच पहिली गोष्ट विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या पथ्यावर पडली.

सहकारातील निवडणुकांत राजकारण येत नाही असे म्हणतात. त्याप्रमाणे शेजारच्या अनेक कारखानदारांनी इतरांच्या संस्थेत आम्ही लक्ष घालत नाही असे म्हणत या निवडणुकीत लक्ष न देण्याची भूमिका घेतली. तर काहींनी मात्र शेजार धर्म पाळत विद्यमान अध्यक्षांना मदत करण्याची भूमिका घेतली. ही बाबच बाळासाहेब पाटील यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली.

सह्याद्री कारखान्याच्या एकूण मतदारांपैकी ७५ टक्के मतदान हे निव्वळ कराड तालुक्यात आहे. त्यातील काही इतर विधानसभा मतदारसंघात आहे. मात्र २५ टक्के मतदान हे इतर ४ तालुक्यात आहे. साहजिकच इतर तालुक्यातील व इतर मतदारसंघातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना सहकार्य करण्याची घेतलेली भूमिका यानिमित्ताने महत्त्वाची ठरली आहे. म्हणून तर तब्बल ८ हजाराच्या मताधिक्याने बाळासाहेब पाटील यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे.

त्यांनी दूर राहणे पसंत केले

आम्ही इतरांच्या संस्थेत लक्ष घालत नाही अशी भूमिका घेत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले. साहजिकच त्यांची ही चुप्पी देखील सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचीच ठरली.

'कडेगाव'करांनी घेतली बाळासाहेबांची 'कड'!

 सह्याद्री कारखान्याचे कार्यक्षेत्र नजीकच्या कडेगाव तालुक्यात आहे. येथील प्रमुख नेते व साखर कारखानदार माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम, भाजपचे नेते,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी बाळासाहेब पाटील यांच्या पनेलची कड घेतल्याचे दिसले. त्याचाही फायदा या निवडणुकीत बाळासाहेबांना निश्चितच झाला आहे.

आता, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही

कराड तालुक्याच्या राजकारणात जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून तत्कालीन मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील व आत्ताचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यात नवा पैरा सुरू झाला आहे. तोच पैरा शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची कायम राहिला होता. आता सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतील वेगळे काय होणार? भोसले समर्थकांनी काय भूमिका घेतली हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. 

ते फक्त फेक्सवरच दिसले!

आणखी एक नजीकचे कारखानदार म्हणजे एड. उदयसिंह पाटील - उंडाळकर होत. त्यांचा फोटो मात्र विरोधातील आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनेलच्या फ्लेक्सवर झळकत राहिल. त्यांचे काही कार्यकर्ते त्या पनेलमधून रिंगणातही होते.पण उदयसिंह पाटील मात्र प्रचारात कोठेही सक्रिय दिसले नाहीत. आता याचीही उलट-सुलट चर्चा सुरु आहे बरं!

Web Title: Nearby factory owners support Balasaheb Patil in Sahyadri Sugar Factory elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.