राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी दरासाठी रस्त्यावर ओतले कांदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 14:52 IST2018-12-23T14:52:33+5:302018-12-23T14:52:37+5:30
कांद्याला चांगला दर देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सातारा-कोरेगाव रस्त्यावर कांदे ओतून निषेध व्यक्त केला.

राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी दरासाठी रस्त्यावर ओतले कांदे
सातारा : कांद्याला चांगला दर देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सातारा-कोरेगाव रस्त्यावर कांदे ओतून निषेध व्यक्त केला. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्यासह १३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताºयातील नियोजित कार्यक्रमासाठी सकाळी अकराच्या सुमारास सैनिक स्कूलच्या मैदानावर हेलिकॉप्टरमधून उतरले. यावेळी त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही होते. यादरम्यान, कार्यक्रमस्थळाशेजारीच सातारा-कोरेगाव रस्ता आहे. या रस्त्यावरच कांद्याला मिळालेले अनुदान कमी आहे, कांद्याला दर चांगला मिळावा, अशी घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आले. त्यानंतर या सर्वांनी घोषणा देत रस्त्यावरच कांदा ओतला. यामुळे तेथे बंदोबस्तासाठी असणाºया पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणा देत असतानाच पोलिसांनी सर्वांनाच ताब्यात घेतले. यामध्ये जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, बाळासाहेब महामूलकर यांचा समावेश होता. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. दुपारपर्यंत सर्वजण पोलीस ठाण्यातच होते.