छेड करणाऱ्या युवकाचा खून करून पाय तोडला, वडूथमधील घटनेने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:16 IST2020-07-23T15:10:55+5:302020-07-23T15:16:34+5:30
बहिणीची छेड काढून सतत त्रास देत असल्याच्या रागातून दोन चुलत सख्ख्या भावांनी एका युवकाचा खून करून त्याचा पाय तोडल्याची खळबळजनक घटना वडूथ, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा चुलत भावांना अटक केली आहे.

छेड करणाऱ्या युवकाचा खून करून पाय तोडला, वडूथमधील घटनेने खळबळ
सातारा : बहिणीची छेड काढून सतत त्रास देत असल्याच्या रागातून दोन चुलत सख्ख्या भावांनी एका युवकाचा खून करून त्याचा पाय तोडल्याची खळबळजनक घटना वडूथ, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा चुलत भावांना अटक केली आहे.
सचिन विठ्ठल पवार (वय ३०, रा. वडूथ, ता. सातारा) असे खून झालेल्याचे तर रणजित बाळकृष्ण साबळे, अमित दत्तात्रय साबळे (रा. वडूथ, ता. सातारा) असे संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन पवार संशयिताच्या बहिणीला त्रास देत होता. तसेच तिच्या मुलीलाही काही दिवसांपूर्वी त्याने मारहाण केली होती. यामुळे दोघे सख्खे चुलत भाऊ सचिन पवारवर चिडून होते.
दरम्यान, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लॉकडाऊमुळे माणसे घरातच थांबून होती. याचवेळी संशयित रणजित आणि अमित या दोघांनीही सचिनवर त्याच्या घरासमोरच कुऱ्हाडीने आणि फरशीने वार करून त्याचा खून केला. तसेच त्याचा डाव पाय घोट्यापासून तोडला. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन सचिनचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना मिळाल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ वडूथ येथे दाखल झाले. त्यावेळी सचिनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर बाजूलाच त्याचा तुटलेला पाय पडला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी या खुनाबाबत माहिती मिळवून तत्काळ रणजित आणि अमितला अटक केली. न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही दि. २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी हवालदार धीरज कुंभार यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे हे करत आहेत.
तो एकटाच राहत होता..
सचिन पवारच्या आई-वडिलांचे सुमारे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तो एकटाच राहत होता. त्याला ना बहीण ना भाऊ.तो मूळचा शिवथरचा; मात्र त्याला वतनावर वडूथमधील जमीन मिळाली. त्यामुळे तो वडूथमध्ये राहत होता. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात एसटी चालकाला मारहाण केल्याचा गुन्हाही दाखल होता, असेही पोलिसांनी सांगितले.