सातारा : पहिला प्रेमविवाह करूनही दुसऱ्यांदा प्रेम जडलं. दोघांनी आणाभाकाही घेतल्या. पळून जाऊन लग्न करण्याचं ठरलं. पण, ऐनवेळी म्हणे तिने दगा दिला. शेतकामासाठी असलेला कटर त्याने तिच्या गळ्यावरून फिरविला. यातच तिचा तडफडून मृत्यू झाला. अनैतिक संबंधाच्या क्रूरतेने दोघांच्याही आयुष्याचा मात्र, शेवट झाला.शिवथर, ता. सातारा येथील पूजा जाधव खून प्रकरणात पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केल्यानंतर पोलिसांच्या तपासात बरीच धक्कादायक माहिती समोर आली. पूजा जाधव हिचा दहा वर्षांपूर्वी गावातील प्रथमेश या तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या संसार वेलीवर गोंडस मुलाने जन्म दिला. पती प्रथमेश साताऱ्यात रोज कामासाठी यायचा तर सासू, सासरे शेतात जायचे. पूजा घरी एकटीच असायची. याचदरम्यान गावातील अक्षय या तरुणासोबत पूजाचे प्रेमसंबंध जुळले. गेल्या सहा वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. अक्षयची सात-आठ एकर शेती व जेसीबी. त्यामुळे आर्थिक परिस्थिती त्याची उत्तमच. पूजा विवाहित असतानाही तो तिच्यावर प्रेम करत होता. पूजाकडूनही म्हणे त्याला प्रतिसाद मिळत होता. ती एकेदिवशी माझ्याशी लग्न करेल, या आशेवर अक्षय होता. त्यामुळे त्याने दुसऱ्या कोणा मुलीसोबत लग्नही केेले नव्हते. आपण दोघे पळून जाऊ, असा तगादा त्याने तिच्याजवळ लावला होता.
वाचा- शिवथरच्या विवाहितेचा खून अनैतिक संबंधातून, पळून जाण्यास नकार दिल्याने चिडून गळा चिरला; प्रियकराला अटककाही दिवसांपूर्वी तिने पळून जाण्यास होकार दिल्याचे अक्षय पोलिसांना सांगतोय, परंतु घटनेदिवशी याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. शेतकामासाठी जवळ असलेल्या कटरच्या साह्याने त्याने पूजाच्या गळ्यावर वार केले. यात ती रक्तबंबाळ झाली. पूजाचा मृत्यू झाल्यानंतर अक्षय याने महामार्गावरून येऊन एका ट्रकमध्ये बसून पुणे गाठले.
घटनेनंतर काही तासांतच पोलिसांना अक्षय आणि पूजाच्या प्रेमसंबंधाबद्दल गावात माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. रात्री पुण्यात जाऊन पथकाने अक्षयला अटक केली.
दोघांचेही मोबाईल जप्तपूजा आणि अक्षय या दोघांचेही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या मोबाईलमधून आणखी बरीच माहिती समोर येणार आहे. दोघांचेही चॅटिंग, काॅल तपासले जात आहेत.
तिला समजावले होते..अक्षयसोबतचे नाते पूजा हिच्या जवळच्या लोकांना समजले होते. आपली भावकी एक आहे, तू असं काय केलंस तर समाजात आपली बदनामी होईल, तुला एक लहान मूल आहे. असं तिला काही दिवसांपूर्वीच जवळच्या लोकांकडून समजविण्यात आले होते.