अपहरण झालेल्या चिमुकल्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 11:04 IST2020-10-01T11:00:26+5:302020-10-01T11:04:55+5:30
फलटण तालुक्यातील काळज येथील अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकल्याचा अपहरणकर्त्यांनी खून केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. घरापासून जवळच असलेल्या विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे जिल्हा अक्षरशः हादरून गेला आहे.

अपहरण झालेल्या चिमुकल्याचा खून
सातारा: फलटण तालुक्यातील काळज येथील अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकल्याचा अपहरणकर्त्यांनी खून केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. घरापासून जवळच असलेल्या विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे जिल्हा अक्षरशः हादरून गेला आहे.
ओमकार अधिक भगत (वय दहा महिने) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ओमकारचे त्याच्या घरासमोरून एका दाम्पत्याने अपहरण केल्याचे समोर आले होते. त्यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती.
ओमकारच्या शोधासाठी पाचशेहून अधिक पोलीस कर्मचारी, ८०० ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते. चोवीस तास उलटून गेली तरी त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिक चिंतेत पडले होते.
सलग दुसऱ्या शोध मोहीम सुरू असताना घरापासून केवळ पन्नास मीटरवर असलेल्या विहिरीत ओमचा मृतदेह आढळून आला आणि गत दोन दिवसांपासून सुरू असलेली शोधमोहीम थांबली गेली.
आता पोलिसांना प्रश्न पडलाय तो ओमकारचा खून कोणी केला आणि कशासाठी. काही दिवसांपूर्वी ओमकारच्या वडिलांसोबत काहीजणांची वादावादी झाली होती. यातून तर ओमकारचा बळी गेला नसावा ना, अशी शंकाही पोलिसांना येत आहे.