‘मेंबर’साठी पालिका उपजीविकेचे साधन!

By Admin | Updated: March 14, 2016 21:39 IST2016-03-14T21:39:44+5:302016-03-14T21:39:44+5:30

नगरसेवकांचेच बॉम्बगोळे : प्रभागातील इतर प्रतिनिधी विरुद्ध गटाचे असल्यास होते घुसमट

Municipality's tool for 'Member'! | ‘मेंबर’साठी पालिका उपजीविकेचे साधन!

‘मेंबर’साठी पालिका उपजीविकेचे साधन!

सातारा : कामांचे अशास्त्रीय आराखडे मंजूर होतातच कसे, हा प्रश्न सातारकरांना अनेक दिवस पडत आहे. तथापि, ‘नगरपालिका हे काही नगरसेवकांसाठी उपजीविकेचे साधन बनले आहे,’ अशी पोलखोल नगरसेवकानेच केल्याने या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. दरम्यान, एका प्रभागात तीन नगरसेवक एका गटाचे आणि एकच दुसऱ्या गटाचा असेल, तर त्याची घुसमट होते, हे वास्तवही नगरसेविकेनेच उघड केले आहे. ‘लोकमत आपल्या प्रभागात’ उपक्रमांतर्गत रविवारी ‘लोकमत टीम’ने प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर या प्रभागातील नगरसेवक अ‍ॅड. विलास आंबेकर, दीपलक्ष्मी नाईक आणि अ‍ॅड. दत्तात्रय बनकर यांनी ‘लोकमत’ कार्यालयात मुक्तपणे मते मांडली. झालेल्या आणि होऊ घातलेल्या कामांची यादी सादर करतानाच काही ठिकाणी त्यांनी अंतर्गत बाबींवरही प्रकाश टाकला. पोवई नाक्यावर बुद्धिबळाच्या प्याद्यांची आरास केलेला दुभाजक उभारण्यात आला आहे. तो अ‍ॅड. विलास आंबेकर यांच्या वॉर्डात असल्यामुळे या अशास्त्रीय दुभाजकाविषयी त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी ‘पालिका काही नगरसेवकांचे उपजीविकेचे साधन बनली आहे,’ असे सांगून त्यांनी तपशील देण्यास नकार दिला. प्रभाग तीनमध्ये दीपलक्ष्मी नाईक एकट्याच नगरविकास आघाडीच्या आहेत. ‘इतर नगरसेवक सातारा विकास आघाडीचे असल्यामुळे अडचणी उद््भवतात का,’ असे विचारले असता ‘अडचणी येतात; पण मी त्रास करून घेत नाही,’ असे उत्तर त्यांनी दिले. सर्वाधिक विकासकामे अ‍ॅड. दत्तात्रय बनकर यांच्या गोडोली भागात झाली आहेत. तथापि, जवळच असलेल्या त्रिशंकू भागातील अनिर्बंध बांधकामांमुळे त्यांच्या वॉर्डावर अतिरिक्त भार पडतो, ही बाब चर्चेत पुढे आली. ओढ्यातील अतिक्रमणांमुळे उद््भवणारी पूरस्थिती ही प्रमुख समस्या असल्याचे अ‍ॅड. बनकर यांनी मान्य केले; मात्र त्यामुळेच हद्दवाढीचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुम्ही एका आघाडीचे प्रतोद आहात; मात्र संपूर्ण शहराकडे लक्ष न देता केवळ वॉर्डातच कामे करता असा तुमच्यावर आक्षेप आहे,’ हे निदर्शनास आणून दिले असता, ‘ही कमतरता आगामी काळात भरून काढेन,’ असे आश्वासन अ‍ॅड. बनकर यांनी दिले. शहरासाठी एकात्मिक ओढा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण पुढाकार घेऊ, असेही ते म्हणाले. जिजाऊ गार्डन, गोडोली तळे, गोडोलीतील रस्ते, गल्लीबोळांमध्ये पेव्हर, कल्याणी शाळेसमोर साडेतेरा एकराच्या भव्य उद्यानाचे सुरू असलेले काम, आठ टप्प्यांचा भारतातील दुसरा वॉकिंग ट्रॅक, ध्यानधारणेसाठी पिरॅमिड््स, विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन, अ‍ॅम्फी थिएटरचे काम, अ‍ॅक्वा-लेझर शो अशा माध्यमातून ‘फिरायला जावे तर गोडोलीत,’ असे म्हणण्यास सातारकरांना भाग पाडणे, हे अ‍ॅड. बनकर यांचे स्वप्न आहे. अ‍ॅड. विलास आंबेकर यांनी केंद्राच्या निधीतून पोवई नाका ते कॅनॉल रस्ता, ११ क्रमांकाच्या वॉर्डातील रस्ते, अजिंक्य कॉलनी, देवी कॉलनीतील अंतर्गत रस्ते, बंद अवस्थेतील ट्रॅफिक सिग्नल सुरू करणे, रस्त्यावरील दुकानदारांचे पुनर्वसन अशी कामे केली असून, पोवई नाक्यावरील उड्डाणपूल, पार्किंग, केवळ महिलांसाठी स्वच्छतागृह, सयाजीराव हायस्कूलसमोर भुयारीमार्ग अशी कामे त्यांना करायची आहेत. दीपलक्ष्मी नाईक यांनी ‘महिलांसाठी कट्टा’ ही संकल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणली आहे. वाळवणे घालण्यापासून कलागुणांच्या दर्शनापर्यंत सर्वकाही या कट्ट्यावर होऊ शकते. याखेरीज उपलब्ध निधीत गटारे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, केवळ महिलांसाठी बाक, पोलीस मुख्यालय ते प्रकाश लॉज रस्त्यावर जीवन प्राधिकरणाची स्वतंत्र लाइन अशी कामे त्यांनी केली. (लोकमत चमू) प्रभागात महिलांसाठी शौचालये, सांडपाण्यासाठी बंदिस्त पाइपलाइन, रस्ते अशी अनेक कामे केली आहेत. शिवाजी मार्केटला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न आहे; मात्र तांत्रिकतेत हा प्रश्न अडकला आहे. गटारांवर लॉफ्ट बसविले होते. मात्र, ते चोरीस गेले आहेत. नियोजन सभापती असताना बसस्थानकाच्या ‘आउट गेट’प्रश्नी निर्णय घेतला. अण्णा भाऊ साठे स्मारक परिसराचे सुशोभीकरण मंजूर करून घेतले. - सीता हादगे, नगरसेविका कोल्हाटी वस्तीचे होणार पुनर्वसन कोल्हाटी वस्तीतील अस्वच्छतेबद्दल तेथील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला होता. वस्तुत: ही वस्ती ‘ग्रीन झोन’मध्ये येते. त्यामुळे वस्तीचे पुनर्वसन गरजेचे असल्याचे अ‍ॅड. बनकर यांनी सांगितले. या कुटुंबांसाठी १७३ घरकुले मंजूर झाली असून, चारशे चौरस फुटांच्या घरात ही कुटुंबे लवकरच राहावयास जातील, असे ते म्हणाले. आता पुराची शक्यताच नाही सुळाचा ओढा, भैरोबाचा ओढा आणि कळंबीचा ओढा असे तीन ओढे गोडोली भागात आहेत. यातील कळंबीच्या ओढ्याला एक फुटी पाइपमध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केल्यामुळेच गोडोलीत पूरस्थिती निर्माण झाली होती. हा पाइप फोडल्यानंतर एकदाही पूर आला नाही. भविष्यातही पूर येणार नाही असे अ‍ॅड. बनकर यांनी सांगितले. नोकरशाहीचे उपद््व्याप ं‘त्रिशंकू भागात बांधकामे मंजूर करताना सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांनी एसी कार्यालयात बसून मान्यता दिली. त्यामुळे अनेक ओढे संकोचले. बिल्डरांनी मनमानी केली. हे नोकरशाहीचे उपद््व्याप आम्हाला भोवले,’ अशी अ‍ॅड. बनकर यांची तक्रार आहे. संतोष महाडिक यांचे स्मारक सायन्स कॉलेजसमोर कर्नल संतोष महाडिक यांचे मोठे स्मारक सायन्स कॉलेजसमोर होणार असल्याची माहिती अ‍ॅड. बनकर यांनी दिली. सायन्स कॉलेजमध्ये महाडिक यांचे शिक्षण झाले होते. जिल्ह्यातील कोणताही जवान शहीद झाल्यास कर्नल महाडिक यांच्या स्मारकाजवळ त्याला मानवंदना दिली जाईल आणि मग पार्थिव संबंधिताच्या गावी नेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Municipality's tool for 'Member'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.