सातारा जिल्ह्यात पालिका निवडणुका विना व्हीव्हीपॅट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 19:15 IST2025-11-07T19:15:03+5:302025-11-07T19:15:50+5:30
Local Body Election: जिल्ह्यातील ९ पालिकांसाठी २ डिसेंबर मतदान, दुसऱ्या दिवशी मतमोजणी

संग्रहित छाया
सातारा : जिल्ह्यातील नऊ पालिका व एक नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. दरम्यान, नगरपालिकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करता येणार नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगर प्रशासनचे सहआयुक्त अभिजित बापट उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, दि. ४ पासून नगरपालिका व नगरपंचायत आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक अर्ज भरण्याचा कालावधी १० ते १७ नोव्हेंबर दुपारी २ वाजेपर्यंत आहे. उमेदवारांनी १० ते १७ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत https://mahasecelec.in या संकेतस्थळावर अर्ज भरून प्रिंट काढून दुपारी ३ पर्यंत सादर करायचे आहेत.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग या दोन स्वतंत्र वैधानिक संस्था आहेत. भारत निवडणूक आयोगाने बनवलेली मतदार यादी राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना वापरते. यावेळची मतदार यादी १ जुलै २०२५ पर्यंतची आहे. यामध्ये राज्य निवडणूक आयोगाला बदल करता येणार नाही. तथापि, दुबार मतदारांबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.
दोन्ही आयोगांनी मतदान प्रक्रियेनुसार मतदार यंत्रे विकसित केली आहेत. त्यांच्या रचना वेगवेगळ्या आहेत. नगरपालिका निवडणुकांना मतदारांना दोन ते तीन उमेदवार निवडून द्यायचे असतात. त्यामुळे या निवडणुकांना व्हीव्हीपॅट वापरता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
- ऑनलाइन अर्ज भरण्याचा कालावधी १० ते १७ नोव्हेंबर दुपारी २ वाजेपर्यंत
- अर्ज स्वीकृती : १० ते १७ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत
- छाननी व वैध उमेदवार यादी : १८ नोव्हेंबर सकाळी ११ पासून
- अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : २१ नोव्हेंबर (अपील असल्यास २५ नोव्हेंबर)
- चिन्ह वाटप व अंतिम यादी : २६ नोव्हेंबर
- मतदान : २ डिसेंबर सकाळी ७:३० ते सायं. ५:३०
- मतमोजणी व निकाल : ३ डिसेंबर
मतदार व मतदान केंद्रे
- पुरुष मतदार : १,९१,४६४
- महिला मतदार : १,९४,७३२
- इतर मतदार : ५९
- एकूण मतदार : ३,८६,४५५
- मतदान केंद्रे : ४३७
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा
नगरपालिका - अध्यक्ष - सदस्य
- ‘अ’ वर्ग नगर परिषद - १५ लाख - ५ लाख
- ‘ब’ वर्ग नगर परिषद - ११.२५ लाख - ३.५० लाख
- ‘क’ वर्ग नगर परिषद - ७.५० लाख - २.५० लाख
- नगरपंचायत - ६ लाख - २.२५ लाख