महाबळेश्वर सहलीसाठी आलेल्या पर्यटकांना पालिकेने पाठविले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:04+5:302021-06-16T04:51:04+5:30
महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये पावसाळी सहलीसाठी आलेल्या १०० हून अधिक पर्यटकांची वाहने नगरपालिका व वनविभागाच्या व्यवस्थापन समिती कर्मचा-यांनी वेण्णा तलाव ...

महाबळेश्वर सहलीसाठी आलेल्या पर्यटकांना पालिकेने पाठविले परत
महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये पावसाळी सहलीसाठी आलेल्या १०० हून अधिक पर्यटकांची वाहने नगरपालिका व वनविभागाच्या व्यवस्थापन समिती कर्मचा-यांनी वेण्णा तलाव तपासणी नाक्यावरून परत पाठविली. तर, येथील सर्वच नाक्यांवर पर्यटकांची कसून चौकशी केली जात आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेतून राज्य सावरत असताना बहुतांशी ठिकाणचे निर्बंध काहीअंशी शिथिल केले आहेत. सातारा जिल्हाही अपवाद नाही. जिल्हा कोरोना नियमांच्या बाबतीत चौथ्या स्थानावर असल्यामुळे अद्यापही शिथिलतेबाबत कडक धोरण आहे. तर, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद आहेत. जिल्हाबंदी शिथिल झाल्याने महाबळेश्वर, पाचगणीसारख्या पर्यटनस्थळी पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या पावसाळी हंगाम सुरू असल्याने निसर्गाचे विलोभनीय दृश्य व छोटे धबधबे सुरू झाले आहेत. तसेच पावसाळी धुके पर्यटकांना भुरळ पाडत आहे. त्यातच शहरातील हॉटेल, लॉज, दुकाने निर्बंध कमी न झाल्याने बंद आहेत. त्यामुळे पर्यटकांत नाराजी आहे. तर, परिसरातील काही खासगी बंगले, लॉजेस नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत.
महाबळेश्वर शहर व तालुक्याचा विचार केल्यास हा तालुका जवळपास कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळे ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी काही अंशी खुली करावीत. त्यासाठी सर्व नियम व अटींचे पालन करू, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. याबाबत महाबळेश्वर, पाचगणी येथील हॉटेल, लॉजमालक, विविध व्यावसायिक, व्यापारी, दुकानदारांनी निर्बंध शिथिल करण्याबाबत जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे. मात्र, परवानगी न मिळाल्याने पालिकेने महाबळेश्वरला आलेली पर्यटकांची वाहने वेण्णा तलाव तपासणी नाक्यावरून परत पाठविली.
चौकट :
युक्ती केली पण, परत जावे लागले...
महाबळेश्वरला आलेल्या अनेक पर्यटकांना रस्त्याच्या कडेला बसवून पार्सल सेवेतून मिळालेले खाद्यपदार्थ खाऊन परतावे लागले. काहीजण विविध युक्त्या करून शहरात आल्याचे दिसून आले. मात्र, पालिका तपासणी पथकांनी त्याचा शोध घेऊन त्यांनाही परत पाठविले. सध्या येथील सर्वच नाक्यांवर बाहेरून येणा-यांची कसून चौकशी केली जात आहे.
फोटो ओळ : महाबळेश्वरमध्ये येणा-या पर्यटकांना प्रवेशबंदी आहे. त्यामुळे विविध नाक्यांवर तपासणी करून त्यांना परत पाठविण्यात येत आहे. (छाया : अजित जाधव)
\\\\\\\\\\\\\\\\\\\