महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:11 IST2025-09-19T16:11:31+5:302025-09-19T16:11:54+5:30
महाबळेश्वर : मुंबईहून फिरण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध पर्यटक हसमुख करमशी गाला (वय ७९, रा. ठाणे) यांचा बुधवारी अचानक मृत्यू झाला. ...

संग्रहित छाया
महाबळेश्वर : मुंबईहून फिरण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध पर्यटक हसमुख करमशी गाला (वय ७९, रा. ठाणे) यांचा बुधवारी अचानक मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, शांतीलाल करमशी गाला (वय ६८, रा. परळ, मुंबई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीलाल, हसमुख, मनीलाल, चुनीलाल फिरण्यासाठी महाबळेश्वरला आले होते. दुपारी चौघेही हॉटेलहून बाहेर पडून महाबळेश्वर मंदिर, ईको पॉइंट व गार्डन येथे फिरले. त्यानंतर वेण्णालेक येथे बोटिंग करून बाहेर पडले असता दुपारी सव्वा चार वाजता हसमुख गाला यांना अचानक चक्कर आली व ते जमिनीवर कोसळले. नातेवाइकांनी तातडीने खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय, महाबळेश्वर येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
वृद्धापकाळामुळे नैसर्गिक मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी मृत्यू अचानक व सार्वजनिक ठिकाणी झाल्याने घटनेबाबत संशय निर्माण झाला आहे. महाबळेश्वर पोलिसांनी याबाबत नोंद घेत चौकशी सुरू केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर याच्या मार्गदर्शनखाली पोलिस हवालदार संतोष शेलार करत आहेत.