सातारा पालिकेचा रणसंग्राम आता निर्णायक वळणावर, दोन्ही राजांचा नगराध्यक्षपदावर दावा
By सचिन काकडे | Updated: November 17, 2025 15:44 IST2025-11-17T15:44:29+5:302025-11-17T15:44:51+5:30
Local Body Election: आज खुलणार नावांचा लखोटा, कोणाच्या नावावर ‘राजमुद्रा’?

सातारा पालिकेचा रणसंग्राम आता निर्णायक वळणावर, दोन्ही राजांचा नगराध्यक्षपदावर दावा
सचिन काकडे
सातारा : सातारा नगरपालिकेचा राजकीय रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, नगराध्यक्षपदासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही ‘राजें’ने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दोन्ही मातब्बर नेत्यांनी नगराध्यक्षपदावर दावा केल्याने कोणाच्या नावावर ‘राजमुद्रा’ उमटवायची, याचा तिढा अद्यापही कायम आहे. मात्र, नगराध्यक्षपदासाठीचा हा ‘संग्राम’ आता अंतिम टप्प्यात असून, सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व ५० नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह नगराध्यक्षपदाचे ‘गुपित’ उघड होणार आहे.
सातारा पालिकेची संपूर्ण सूत्रे ताब्यात घेत भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेला उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. निवडून येण्याची क्षमता आणि सक्षम जनसंपर्क या कठोर निकषांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मूळ भाजप आणि शिंदेसेनेच्या निष्ठावंतांना संधी देत ५० उमेदवारांची यादी दोन्ही राजेंकडून जवळपास निश्चित झाली असल्याची चर्चा आहे. परंतु, सर्वांत महत्त्वाची असलेली नगराध्यक्षपदाची जागा कोणाच्या वाट्याला येणार, यावरून पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे.
रणधुमाळीतील गुप्त बैठका..
गेल्या तीन दिवसांत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्यात गाठीभेटी व बैठकांचा धडाका सुरू आहे. चर्चा व निवडीची कोणालाही कानकून लागू नये यासाठी प्रचंड गुप्तता बाळगण्यात येत असून, या बैठका अज्ञातस्थळी घेतल्या जात आहेत. रविवारीदेखील दोन्ही राजेंमध्ये नगराध्यक्ष निवडीवरून बराच ‘काथ्याकूट’ झाला. या बैठकीत काही जागा या बिनविरोध करण्यावरही खल झाल्याची माहिती मिळत आहे.
कोणाच्या नावावर ‘राजमुद्रा’?
दोन्ही राजेंकडे नगराध्यक्षपदाला न्याय देऊ शकणारे अनेक जुने व नवीन सक्षम चेहरे उपलब्ध आहेत. मात्र, हे पद खासदार उदयनराजे भोसले यांच्या पारड्यात पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रत्येक उमेदवार तितकाच सक्षम असला तरी अंतिम क्षणी काहीही निर्णय होऊ शकतो. त्यामुळे नगराध्यपदाची ‘राजमुद्रा’ कोणाच्या नावावर उमटविली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस!
नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (दि. १७) शेवटचा दिवस आहे. याच दिवशी राजेंकडून सर्व ५० उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असून, त्यांना पक्षाचे अधिकृत ‘ए बी फॉर्म’दिले जातील. नगराध्यक्ष पदाचा प्रमुख उमेदवार देखील अर्ज दाखल करणार आहे, पण तो ‘गुपित’ चेहरा कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन राजेंकडून नगराध्यक्षपदाचा तिढा न सुटल्यास भाजपकडून उमेदवार दिला जाईल, या चर्चेनेही शहरात रंग भरला.