मॉर्निंग वॉक करताना वाहनाच्या धडकेत सासू, सासऱ्यासह सून ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 15:14 IST2021-01-28T15:11:23+5:302021-01-28T15:14:54+5:30
accident satara- लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ मॉर्निंग वॉकला निघालेल्या सासू सासरे व त्यांच्या सुनेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सासू-सासºयासह सून ठार झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास झाला. बबन नाना धायगुडे (वय ७०), शांताबाई बबन धायगुडे (वय ६४) सून, सारिका भगवान धायगुडे (वय ३४, रा. शेळके वस्ती, लोणंद) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

मॉर्निंग वॉक करताना वाहनाच्या धडकेत सासू, सासऱ्यासह सून ठार
सातारा: लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ मॉर्निंग वॉकला निघालेल्या सासू सासरे व त्यांच्या सुनेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सासू-सासऱ्यासह सून ठार झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास झाला. बबन नाना धायगुडे (वय ७०), शांताबाई बबन धायगुडे (वय ६४) सून, सारिका भगवान धायगुडे (वय ३४, रा. शेळके वस्ती, लोणंद) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोणंद-खंडाळा रस्त्यावरील घाडगे मळा नजिक पहाटे सहाच्या सुमारास सासरे बबन धायगुडे, सासू शांताबाई आणि त्यांची सून सारिका या मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्यांच्या घरापासून काही मीटर अंतरावर हे तिघे पोहोचले असता समोरून आलेल्या भरधाव वाहनाने तिघांना भीषण धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, बबन धायगुडे आणि शांताबाई धायगुडे हे दाम्पत्य जागीच ठार झाले तर त्यांची सून सारिका ही गंभीर जखमी झाली.त्यांना तत्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच वस्तीवरील आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लोणंदचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आले. नेमका अपघात कसा झाला, याची पोलिसांनी नागरिकांकडून माहिती घेतली
घटनास्थळी सापडली नंबरप्लेट
धायगुडे कुटुंबातील तिघांना धडक देऊन पलायन केलेल्या अज्ञात वाहनाची नंबर प्लेट आणि बंपर घटनास्थळी आढळून आला होता. त्यामुळे संबंधित वाहनाचा पोलिसांनी तत्काळ शोध घेतला. धडक दिलेले वाहन कार असून, बारामती तालुक्यातील माळेगाव येथे पोलिसांना सापडले. कार चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याने लोणंद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.