महाबळेश्वरच्या केट्स पॉइंटवर माकडाचा मुलावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 17:14 IST2023-05-05T17:14:26+5:302023-05-05T17:14:51+5:30
हल्ल्यामुळे मुलासह पर्यटक कुटुंबीय प्रचंड घाबरले

महाबळेश्वरच्या केट्स पॉइंटवर माकडाचा मुलावर हल्ला
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ असलेल्या केट्स पॉइंट येथे पर्यटनास आलेल्या पर्यटकाच्या लहान मुलावर माकडाने हल्ला चढवत हाताचा चावा घेतला. या हल्ल्यात नीलेश तोमर (वय १२, रा. मुंबई) या मुलाच्या हातास दुखापत झाली.
जखमी मुलास उपचारासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारांनंतर सोडून देण्यात आले. या हल्ल्यामुळे मुलासह पर्यटक कुटुंबीय प्रचंड घाबरले होते. मॉन्टी वेल्यार (वय ३९ रा. पुणे) यांच्यावर बुधवारी माकडाने अशाच प्रकारे हल्ला चढविला. ते देखील जखमी झाले होते.
केट्स पॉइंटसह इतरही प्रेक्षणीय ठिकाणांवर अशाच प्रकारे होत असलेल्या माकडांच्या उपद्रवामुळे पर्यटकांसह स्थानिक दुकानदार हैराण झाले आहेत. यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक हल्ले या माकडांनी चढवले असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी वन विभागास करण्यात आल्या आहेत. वन विभागाने अशा माकडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.