मोही ग्रामपंचायतीत महिलाच कारभारी, गावकऱ्यांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 14:33 IST2020-12-29T14:28:41+5:302020-12-29T14:33:03+5:30
Grampanchyat Elecation Women Satara- धावपटू ललिता बाबर व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्या मोही ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अकरा महिलांची सर्वानुमते निवड केली असून, आता ग्रामपंचायतीचा कारभार महिलाच पाहणार आहेत.

मोही ग्रामपंचायतीत महिलाच कारभारी, गावकऱ्यांचा निर्णय
म्हसवड : धावपटू ललिता बाबर व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्या मोही ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अकरा महिलांची सर्वानुमते निवड केली असून, आता ग्रामपंचायतीचा कारभार महिलाच पाहणार आहेत.
ललिता बाबर व किरण भगत या खेळाडूंचे गाव म्हणून मोही गावाची ओळख आहे. या गावाची ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या चुरशीने लढली जाते. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करायचीच असा निर्धार ग्रामस्थांनी केला होता. मात्र, काही पारंपरिक राजकीय मंडळींची यंदाही फडात उतरण्याची आंतरिक इच्छा होती; पण गावाचा निर्णय त्यांनीही मान्य केला.
ग्रामस्थांच्या बैठकीत गावातील ज्येष्ठ पाच मान्यवरांची एक समिती नेमण्यात आली. निवडणुकीबाबतचे सर्व अधिकार या कमिटीला देण्यात आले. या पाच सदस्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल असे बैठकीमध्ये सर्वानुमते ठरले. त्यानुसार या पाच सदस्यांनी गावात महिलाराज आणण्याचा निर्णय घेतला. गावातील अकरा महिलांची सदस्य म्हणून अर्ज भरण्यासाठी निवड करण्यात आली.
यामध्ये मंदाकिनी राऊत, पद्मिनी देवकर, कल्पना पिसाळ, रसिका देवकर, सविता देवकर, शितल सुतार, पारुबाई नेटके, बायडाबाई मसगुडे, सुनीता जाधव, सुमन देवकर व वंदना पवार या अकरा महिलांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. फक्त अकरा महिलांचेच अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोहीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. गावातील मान्यवर ज्येष्ठ मंडळी, आजी-माजी सदस्य, पदाधिकारी, पोलीस पाटील, महिला, ग्रामस्थ व युवा वर्ग यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केले.