Satara- घडतंय- बिघडतंय: 'अतुल भोसलें'च्या निवडीने 'भाजप'ला 'अच्छे दिन'!

By प्रमोद सुकरे | Updated: May 16, 2025 14:05 IST2025-05-16T14:04:34+5:302025-05-16T14:05:18+5:30

चर्चेत नसलेल्या पण दमदार असलेल्या भोसलेंना मिळाली संधी

MLA Dr Atul Bhosle election as Satara District President will bring good days to BJP | Satara- घडतंय- बिघडतंय: 'अतुल भोसलें'च्या निवडीने 'भाजप'ला 'अच्छे दिन'!

Satara- घडतंय- बिघडतंय: 'अतुल भोसलें'च्या निवडीने 'भाजप'ला 'अच्छे दिन'!

प्रमोद सुकरे

कऱ्हाड : खरंतर सातारा जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी नक्की कोणाची वर्णी लागणार? याबाबत गेल्या महिन्याभरापासून भाजप कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली होती. यासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. पण या सगळ्यात चर्चेत नसलेल्या पण दमदार असलेल्या कराड दक्षिणचे आमदार डॉ.अतुल भोसले यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने निश्चितच भाजपला 'अच्छे दिन' येणार असल्याची चर्चा आता भाजप कार्यकर्त्यांच्या सुरू आहे.

सातारा जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.मात्र आज याच जिल्ह्यात भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे. पण संपूर्ण जिल्हा भाजपमय झालेला नाही. आता हा जिल्हा भाजपमय करण्याची संधी डॉ.अतुल भोसले यांना आयती चालून आली आहे. आज जिल्ह्यात भाजपमध्ये येऊ इच्छिणारांची संख्या खूप मोठी आहे. यांना सामावून घेत पक्ष संघटन अधिक मजबूत करता येणे शक्य आहे. याचा फायदा डॉ. भोसले नक्कीच करून घेतील यात शंका नाही.

जिल्ह्याच्या राजकारणात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी कार्यरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडी बरोबर तर लढावेच लागणार आहे.पण कदाचित मित्र पक्षांशीही दोन हात करावे लागणार आहेत. कारण प्रत्येकालाच आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती या सगळ्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवायचा असेल तर डॉ. भोसलेंना आपली राजकीय कौशल्ये पणाला लावावी लागणार आहेत .

फडणवीसांच्या गुडबुकमध्ये असल्याने संधी

राजकारणात मोठे व्हायचे असेल तर गॉडफादर असणे आवश्यक असते. डॉ. अतुल भोसले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गॉडफादर लाभला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गुडबुक मध्ये जी काही नावे आहेत त्यात डॉ.भोसलेंचे नाव अग्रक्रमावर आहे. म्हणून तर भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा प्रश्न समोर येताच त्यावर त्यांनी 'भोसले' नावाचे उत्तर शोधून काढले.

सगळ्यांशी गोड संबंध पथ्यावर!

राजकीय पक्ष म्हटले की पक्षांतर्गत कुरघोड्या येतातच. पण पक्षांतर्गत राजकारणापासून दूर राहत सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणारा नेता म्हणून डॉ. अतुल भोसले यांच्याकडे पाहिले जाते. सन २०१४ पासून पक्षाशी एकनिष्ठ राहत सर्वांची गोड संबंध ठेवल्यानेच आज पक्षाचे जिल्हाध्यक्षपद त्यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे .

चार ठिकाणी आमदारांवर जबाबदारी 

खरंतर भाजपने जिल्हाध्यक्ष निवड करताना आजी-माजी आमदार, खासदारांना यापासून दूर ठेवण्याचा अलिखित नियम आखला होता. मात्र साताराच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड करताना त्याला बगल देण्यात आली आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉ.अतुल भोसले यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. अशा प्रकारे राज्यात चार जिल्ह्यात आमदारांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे खात्रीशीर समजते.

येथे घालावे लागणार ज्यादा लक्ष ..

सातारा जिल्ह्यात भाजपचा १ खासदार,४ आमदार आहेत. पण पाटण, कोरेगाव, वाई- खंडाळा व फलटण या ४ ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांचे आमदार आहेत. त्यामुळे या ४ मतदार संघात नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. भोसले यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. भाजपचे ४ चे ८ आमदार करणे आता त्यांच्या हातात आहे.

जिल्ह्याचे नेते होण्याची संधी!

सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर वेळोवेळी कराडच्या नेत्यांचा प्रभाव दिसून आला आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण त्यानंतर दिवंगत विलासराव पाटील- उंडाळकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड ठेवली होती. आता ती संधी जिल्हाध्यक्ष पदाच्या रूपाने डॉ. भोसलेंना चालून आली आहे. ते या संधीचे सोने करतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो.

भाजपकडे एवढा मोठा दुसरा नेता नाही

भाजपकडे जिल्ह्यात १ खासदार, ४ आमदार आहेत.पैकी २ मंत्री असले तरी  डॉ. अतुल भोसले यांच्यासारखा मोठा नेता त्यांच्याकडे दुसरा कोणी नाही. कारण कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांचे सहकार, शिक्षण, अर्थकारण, वैद्यकीय अशा सर्वच आघाड्यावर त्यांची आघाडी आहे. आता तर शिरवळ येथे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या दुसऱ्या संकुलाची उभारणी होत आहे‌.याच साऱ्या बाबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेरल्याचे बोलले जाते.

Web Title: MLA Dr Atul Bhosle election as Satara District President will bring good days to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.