साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 08:32 IST2025-12-14T08:32:28+5:302025-12-14T08:32:52+5:30
मुंबईच्या गुन्हे शाखा पथकाची कारवाई; आरोपींना मुंबईत आणणार; ड्रग्ज माफियांची साखळी शोधणार

साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
मुंबई/साताराः गुन्हे शाखेने साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात शनिवारी सकाळी छापा घालून मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त केला. मुंबई, पुणे, साताऱ्यातील पाच दिवसांतील कारवाईत एकूण सुमारे ११५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईत विशाल मोरे या व्यक्तीसह त्याच्या सहा साथिदारांना अटक करण्यात आली.
मुलुंड पश्चिममध्ये ९ डिसेंबर रोजी दोघांकडून १३६ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिली. या दोघांच्या चौकशीतून विशाल मोरे आणि अन्य आरोपींची नावे पुढे आली. साताऱ्यातील कारवाईत ७.५ किलो घन स्वरूपातील एमडी, ३८ किलो लिक्विड एमडी तसेच निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा माल असा २५ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक अरुण थोरात, सहाय्यक निरीक्षक श्रीकांत करकर, सुहास खरमाटे, अमोल माळी, रामदास कदम, उपनिरीक्षक स्वप्नील काळे, महेश शेलार या पथकाने केली. सर्व आरोपींना मुंबईत आणले जाणार आहे.
अटक आरोपींमध्ये मजूर, तंत्रज्ञांचा समावेश
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींना रविवारी मुंबईत आणले जाईल. अटक आरोपींमध्ये कारखान्यात काम करणारे पश्चिम बंगाल, आसाम राज्यातील मजूर, तंत्रज्ञ, अमली पदार्थ वाहून नेणारे, विकणाऱ्यांचा समावेश आहे. या कारखान्यास आर्थिक सहकार्य करणारे, कारखान्यात तयार झालेला अंमली पदार्थ राज्याच्या कानाकोपऱ्यात विकणाऱ्यांच्या साखळीबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाईल, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
घरमालक काय म्हणताहेत
१. ज्यांच्या बंद घरात हा प्रकार उघडकीस आला त्याचे घरमालक गोविंद शिंदकर म्हणाले, चार वर्षांपासून आम्ही या वाड्यात राहात नाही.
२. मी आजारी पडल्यानंतर गावात राहायला आलो. गावातील एका तरुणाने माझ्याकडून वाड्याची चावी नेली होती.
ती जागा नेमकी कोणाची ?
सावरी गावातील ती जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची की नातेवाईंकांची? असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गृहमंत्रालयाने याबाबत तातडीने खुलासा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मात्र, गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.