स्ट्रॉबेरीला दिसतेय माया; पण आभाळाची छाया!

By Admin | Updated: November 12, 2014 23:30 IST2014-11-12T21:57:45+5:302014-11-12T23:30:49+5:30

शेतकऱ्यांची स्थिती : उत्पादन सुरू ; २०० रुपयांहून अधिक मिळतोय दर

May look strawberry; But the shadow of the sky! | स्ट्रॉबेरीला दिसतेय माया; पण आभाळाची छाया!

स्ट्रॉबेरीला दिसतेय माया; पण आभाळाची छाया!

संजीव वरे - वाई -संपूर्ण देश-विदेशातून वाई-पाचगणी व महाबळेश्वर या ठिकाणी फिरावयास येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण व मागणी असणाऱ्या ‘स्ट्रॉबेरी’च्या फळांचे उत्पादन सुरू आहे. बाजारपेठेत ‘स्ट्रॉबेरीच्या’ फळांची आवक वाढली आहे. सध्या बाजारपेठेत चांगला दर असून, ढगाळ व दूषित हवामानाने शेतकरी मात्र चिंतेत आहे. दरम्यान, स्ट्रॉबेरीचा किलोचा दर २०० ते ३०० रुपये किलो झाला आहे.
जगभरातून वाई-पाचगणी आणि महाबळेश्वरला फिरावयास लाखो पर्यटक येत असतात. येथील निसर्गसौंदर्य, हिरवेगार डोंगर, आकाशाला भिडणारे उंच सह्याद्री पर्वत व डोंगर दऱ्या, दाट झाडी व थंड हवामानाचा मनमुराद आनंद लुटतात. येथील प्रसिद्ध ओळख असणाऱ्या ‘स्ट्रॉबेरीच्या’ फळांना पर्यटकाकडून मोठी मागणी असते. काही वर्षांपूर्वी ‘स्ट्रॉबेरी’ ही महाबळेश्वर परिसरात मुख्य पीक म्हणून शेतकरी पिकवत असत. कालांतराने व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाने व नवनव्या प्रयोगाने स्ट्रॉबेरीची लागवड व उत्पादन सगळीकडे होऊ लागले. हे एक आर्थिक मोठे उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी करू लागले आहेत.
सध्या वाई व परिसरात स्ट्रॉबेरीच्या फळाचे उत्पादन चालू झाले आहे. त्याला दरही चांगला मिळत आहे. एक ट्रे ४०० रुपयांना तर शेतकऱ्यास २०० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. मात्र ढगाळ व दूषित हवामानामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च वाढत आहे.
महाबळेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने रोपांच्या निर्मितीसाठी वाईच्या परिसरात त्याच्या मदर प्लांटची लागवड केली जाते व तयार झालेल्या रोपांची लागवड करतात. रोपे तयार झालेल्या ‘मदर प्लांट’ स्ट्रॉबेरीच्या झाडांना लवकर फळे येतात. या पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न चांगले मिळते. परंतु रोपे परदेशातून येतात.

उत्पादन चांगले ; खर्चही महत्वाचा...
पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन. त्यानंतर फळांना माती लागू नये म्हणून मल्चिंगपेपर किमतीची औषधे व खते याचा वापर करावा लागतो.
हवामानाचीही मोठी साथ लागते. अधिक उत्पादन देणारे पीक असले तरी त्याला उत्पादन खर्चही मोठा असतो.


पाचगणी, महाबळेश्वर भागात स्ट्रॉबेरीचे पीक चांगले आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. पण, आता ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
धोंडिबा वाडकर, सटालेवाडी

Web Title: May look strawberry; But the shadow of the sky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.