हणमंत पाटील -छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : साहित्यिक क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे दलित साहित्याची निर्मिती होय. मराठी साहित्य हे इतर भारतीय भाषांच्या तुलनेत नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. भारतीय भाषांमध्ये दलित साहित्य पहिल्यांदा मराठी भाषेतच लिहिले गेले. मराठी दलित साहित्यातूनच इतर भाषिक साहित्यिकांनी दलित लेखनाची प्रेरणा घेतली. त्यामुळे मराठी साहित्यातील दलित साहित्य हा भारतीय साहित्य विश्वाचा भक्कम आधारस्तंभ व पाया ठरला आहे, असे मत ज्येष्ठ लेखिका व विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांनी व्यक्त केलेे.सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २) डॉ. गर्ग यांच्या हस्ते झाले. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मी हिंदी भाषिक असले तरी मराठीची वाचक व रसिक आहे, असे कौतुक केले. आमच्या अनेक हिंदी लेखकांनी मराठी साहित्य कृतींमधून प्रेरणा घेतली आहे. मराठी साहित्याशी असलेले माझे भावनिक नाते कधीच ओसरलेले नाही, तर काळाच्या ओघात ते अधिकच गडद होत गेले, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
‘झाडाझडती’ अन् ‘कोसला’ही भावली...संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या 'झाडाझडती' या कादंबरीचा मी इंग्रजी अनुवाद वाचला. ही एका बिगर-दलित लेखकाने लिहिलेली असली, तरी ती कुठल्याही दलित साहित्याइतकीच निर्भीड आणि विद्रोही आहे. उर्मिला पवार आणि शरणकुमार लिंबाळे यांसारख्या दलित लेखकांची आत्मचरित्रे मला भावली. एकाही स्त्री पात्राशिवाय असलेली भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला' ही कादंबरीदेखील मी वाचली आहे. त्यानंतर ज्ञानपीठ विजेती 'हिंदू' हीदेखील मी वाचली आहे. विजय तेंडुलकर व महेश एलकुंचवार यांनी लिहिलेली विविध नाटकेही मला भावली, असे गर्ग यांनी सांगितले.
...तर विद्रोही कवितांचा इतिहास अपूर्णदलित साहित्याविषयीची आठवण सांगताना गर्ग म्हणल्या, माझ्या नातीने अमेरिकेतील कॉलेजमध्ये 'विद्रोही मौखिक कविता' या विषयावर लिखाण करताना तिच्या प्रबंधात नामदेव ढसाळ यांच्या ‘अ करंट ऑफ ब्लड’मधील कवितांचा समावेश केला. यावेळी फक्त अमेरिकन कवींचेच संदर्भ द्यायला हवेत, असे प्राध्यापकांनी सांगितले. त्यावर तिने ठामपणे उत्तर दिले, नामदेव ढसाळ आणि मलिका अमर शेख यांच्यासारख्या मराठी दलित कवींच्या उल्लेखाशिवाय 'विद्रोही कवितेचा' इतिहास अपूर्ण आहे.
नामदेव ढसाळ यांच्या विद्रोहाचे कौतुक...मी दलित साहित्यिक नामदेव ढसाळ यांना विचारले, ‘तुमच्या कवितेत केवळ राग आणि विद्रोहच का असतो?’ यावर ते म्हणाले, माझ्या कविता तांडवाचे सूर आळवतात. त्यांचे हे शब्द माझ्या मनात आणि हृदयात खोलवर रुजले. त्यांच्या कवितांचा दिलीप चित्रे यांनी केलेला इंग्रजी अनुवाद ‘अ करंट ऑफ ब्लड’ मी वाचला आहे. त्यांच्या पत्नी मलिका अमर शेख या सुद्धा तितक्याच प्रतिभावंत लेखिका आणि दलित साहित्यातील पहिल्या महिला कवींपैकी एक आहेत, असे कौतुक गर्ग यांनी केले.
‘मृत्युंजय’ हे मी वाचलेले पहिले पुस्तक...मी वाचलेले पहिले मराठी पुस्तक म्हणजे शिवाजी सावंत यांची 'मृत्युंजय' ही कादंबरी. या कादंबरीचा मी हिंदी अनुवाद वाचला होता. या नंतर 'छावा' ही कादंबरीही वाचली, असे गर्ग यांनी सांगितले. त्यानंतर ज्या लेखकाने माझ्या विचारांना पूर्णपणे कवेत घेतले, ते म्हणजे नामदेव ढसाळ.
Web Summary : Mridula Garg hailed Marathi Dalit literature as pivotal to Indian literature at a literary festival. She praised its influence, citing works by Dalit and non-Dalit authors. She highlighted its rebellious spirit and impact on global discourse.
Web Summary : मृदुला गर्ग ने मराठी दलित साहित्य को भारतीय साहित्य के लिए महत्वपूर्ण बताया। उन्होंने दलित और गैर-दलित लेखकों के कार्यों का हवाला देते हुए इसके प्रभाव की प्रशंसा की। उन्होंने इसकी विद्रोही भावना और वैश्विक विमर्श पर प्रभाव को उजागर किया।