Maratha Reservation : शेखर चरेगावकर यांच्या घरी धडकले कऱ्हाडचे मराठा आंदोलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 10:31 IST2018-08-04T10:21:41+5:302018-08-04T10:31:19+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कऱ्हाडमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास काही आंदोलक सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी धडकले. यावेळी निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Maratha Reservation : शेखर चरेगावकर यांच्या घरी धडकले कऱ्हाडचे मराठा आंदोलक
कऱ्हाड (सातारा) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कऱ्हाडमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास काही आंदोलक सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी धडकले. यावेळी निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कऱ्हाडात काही दिवसांपासून येथे मोर्चा, आंदोलने, रॅली काढून आरक्षणाच्या मागणीचा जोर धरला जात आहे. शहरातील दत्त चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर तीन दिवसांपासून मराठा महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. या बेमुदत ठिय्या आंदोलनात तालुक्यातील अनेक महिला सहभागी झाल्या आहेत. काही युवक शुक्रवारी सकाळी कृष्णा नदीपात्रात उतरले होते.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शनिवारी सकाळी आंदोलक अनिल घराळ, अॅड. विकास पवार, नितीन महाडिक, महेश जगताप शेखर चरेगावकर यांच्या निवासस्थानी गेले. तेथे गेल्यानंतर एक मराठा-लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या.
त्यानंतर आंदोलकांना घरात बोलावून चरेगावकर यांनी चर्चा केली. यावेळी शासन मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याचे चरेगावकर यांनी सांगितले.