सरकारने योग्य बाजू न मांडल्याने पुन्हा मराठा आरक्षण रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:25+5:302021-06-04T04:29:25+5:30
पुसेगाव : ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयाने ते ...

सरकारने योग्य बाजू न मांडल्याने पुन्हा मराठा आरक्षण रद्द
पुसेगाव : ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयाने ते आरक्षण योग्य असल्याचा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल झाली. नेमकी याचिकेवर सुनावणी न झाल्याने तसेच सध्याच्या सरकारने योग्य बाजू न मांडल्याने मराठा आरक्षण पुन्हा रद्द झाले,’ असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पुसेगाव येथील शंकर पार्वती मंगल कार्यालयात मराठा आरक्षण आणि भविष्यात लढायची आरक्षणाची लढाई याविषयी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, सेवागिरी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रणधीर जाधव, ॲड. श्रीकृष्ण जाधव, राहुल पाटील, टी. एन. जाधव, अंकुश पाटील, रोहन देशमुख उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘मिळालेले मराठा आरक्षण २०१२ मध्ये रद्द झाले. त्यानंतर शांततेच्या मार्गाने समाजाची रेकॉर्डब्रेक आंदोलने झाली. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. उच्च न्यायालयाने ते आरक्षण योग्य असल्याचा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. आत्ताच्या सरकारने युक्तिवाद करण्यासाठी कनिष्ठ वकील पाठवले. न्यायालयाने मराठीमधील कायदा इंग्लिशमध्ये भाषांतरीत करून देण्याचे आदेश दिले. त्यासाठी सरकारने चार महिने वेळ घेतला. प्रकरण न्यायालयात असल्याने सध्याचे कॅबिनेट मंत्रिमंडळ शांत राहिले. न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर युक्तिवाद न होता विविध समित्यांच्या निष्कर्षांवर झाला. लार्जर बेंचमध्ये आरक्षण नाकारलेले न्यायाधीश होते. सध्याचे सरकार बाजू मांडण्यात कमी पडले. ५० टक्क्यांवरील आरक्षण केंद्राकडे नसून राज्यांकडे आहे. एकदा दिलेले आरक्षण पुन्हा काढून घेणे चुकीचे आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.’
चौकट
सहनशीलतेचा अंत
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाने शांततेत आंदोलने केली, मोर्चे काढले. आता आमचा संयम संपत चालला आहे. यापुढे आमचा समाज रस्त्यावर उतरेल, तेव्हा सरकारच्या पायाखालची वाळू सरकेल. लोकशाहीत संघर्षाशिवाय काही मिळत नाही. मराठा समाज आता टोकाचा संघर्ष करायला एका पायावर तयार आहे,’ अशा भावना ॲड. श्रीकृष्ण जाधव, टी. एन. जाधव, अंकुश पाटील यांनी व्यक्त केल्या.
फोटो :
पुसेगाव येथे मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित चर्चासत्रात हर्षवर्धन पाटील यांनी भूमिका मांडली. (छाया : केशव जाधव)