Local Body Election: उच्च शिक्षित तरुणांची राजकारणात एन्ट्री, दाखवताहेत ‘नवे व्हिजन’!
By दत्ता यादव | Updated: November 8, 2025 16:47 IST2025-11-08T16:46:53+5:302025-11-08T16:47:21+5:30
आम्ही सुधारलो... तुम्हीही सुधारा

Local Body Election: उच्च शिक्षित तरुणांची राजकारणात एन्ट्री, दाखवताहेत ‘नवे व्हिजन’!
दत्ता यादव
सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीत सध्या अनेक उच्च शिक्षित तरुण आपले नशीब आजमावणार आहेत. दोन्ही राजेंपैकी कोणीही तिकीट दिलं, तर निवडणूक लढावयचीच, या इराद्याने काही तरुण प्रचारालासुद्धा लागले आहेत. आपल्या पेठेत व आजूबाजूला आपले मतदार कोण आहेत. याची चाचपणी केली जात आहे. पेठेतील नागरिकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी तरुणांकडून ‘नवे व्हिजन’ दाखवले जात आहे.
प्रस्तापितांना धक्का देण्यासाठी नवे चेहरे पालिकेच्या राजकारणात सक्रिय होऊ लागले आहेत. उच्च शिक्षण हीच एकमेव जमेची बाजू असल्याने अशा तरुणांनाही आपापल्या पेठेतील रहिवाशांकडून ‘तुम्हाला आमचा फुल्ल सपोर्ट’ असे अंतर्गत आश्वासनही दिलं जातंय. सातारा पालिकेमध्ये २५ प्रभागांत तब्बल ५० नगरसेवक निवडून येणार आहेत. शहराच्या हद्दवाढीनंतर नगरसेवकांची संख्या पहिल्यांदाच वाढल्याने अनेकांना पालिकेचा कारभार पाहण्याची प्रबळ इच्छा होऊ लागली आहे. आपापल्या पेठांमध्ये सामाजिक कार्यात सक्रिय तरुणांनाही या निवडणुकीचं तसं पाहिलं, तर भलतंच आकर्षण आहे.
सामाजिक कार्य करताना लोकांचा संपर्क आल्याने या निवडणुकीत आपल्यालाही याचा फायदा होईल, असे आडाखे त्यांच्याकडून बांधले जात आहेत. दुसरीकडे अनेक उच्च शिक्षित तरुणही पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. आयटी इंजिनिअर असलेल्या तरुणांच्या हातात पैसाही आहे. शिवाय त्यांचे कामही अद्याप वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे अनेक तरुणांनी पालिका निवडणूक लढावयचीच, असा निश्चय केला आहे.
उच्च शिक्षित तरुणांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन जरा वेगळाच असतो. त्यांची हुशारी आणि प्रामाणिकपणा भावतो. त्यामुळे चटकन लोक उच्च शिक्षित तरुणांकडे आकर्षित होतात. हे मागील काही निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे. हीच स्थिती ओळखून अनेक उच्च शिक्षित तरुण विकासाच्या वेगवेगळ्या कल्पना जनतेसमोर मांडत आहेत.
घराघरात एआय प्रशिक्षण
केवळ रस्ते, पाणी, गटार यापलीकडेही विकास असून घराघरातील तरुणांना एआय प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासिका, मार्गदर्शन शिबिरे, गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च, महिलांना घरबसल्या शेअर मार्केटचे प्रशिक्षण, पेठेतील सर्वसामान्य नागरिकांना व्यावसाय वाढीसाठी अनुदान, घराघरात सोलर प्रोजेक्ट यासह अनेक नवे प्रोजेक्टचे व्हिजन या उच्च शिक्षित तरुणांकडून दाखवले जात आहे.
आम्ही सुधारलो... तुम्हीही सुधारा
आम्ही उच्च शिक्षण घेतल्याने सुधारलो. हेच शिक्षण तुमच्या मुलांना मिळावे, यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. त्यातूनच प्रशासनाच्यासोबत काम करून तुमचाही विकास करू, असं अनोखं आश्वासनही या उच्च शिक्षित तरुणांकडून दिलं जात आहे.