Satara Politics- घडतंय बिघडतंय: उत्तर कऱ्हाडमध्ये 'मनो-धैर्य' पुन्हा एकवटतयं ?
By प्रमोद सुकरे | Updated: August 1, 2025 12:07 IST2025-08-01T12:05:00+5:302025-08-01T12:07:15+5:30
आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम अन् रामकृष्ण वेताळांचीही मांडीला मांडी

Satara Politics- घडतंय बिघडतंय: उत्तर कऱ्हाडमध्ये 'मनो-धैर्य' पुन्हा एकवटतयं ?
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. भाजपचे आमदार मनोज घोरपडे, भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात स्वतंत्र २ पॅनेल उभी केली. त्यामुळे व्हायचं तेच झालं. पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना हे 'मनो-धैर्य' पुन्हा एकवटताना दिसत आहे. कारण मतदारसंघातील अनेक कार्यक्रमाला मनोज घोरपडे, धैर्यशील कदम अन् रामकृष्ण वेताळ आता मांडीला मांडी लावून बसल्याचे पाहायला मिळत आहे.
खरंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कराडसह सातारा,खटाव व कोरेगाव तालुक्यातील गावांचा समावेश आहे.त्यामुळे येथील राजकीय समीकरणेही इतर मतदारसंघापेक्षा निश्चितच वेगळी आहेत. या मतदारसंघात यापूर्वी अनेकदा तिरंगी लढती झाल्या आणि त्याचा फायदा नेहमीच सत्ताधारी आमदारांना झाला. पण गत विधानसभा निवडणुकीत यापूर्वी एकमेकांविरोधात लढलेल्या मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांचे 'मनो-धैर्य' भाजप नेत्यांनी एकवटले.त्यामुळे मतदार संघात परिवर्तनाचे 'कमळ' फुलले.
पण विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली.माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या ताब्यात असलेल्या या कारखान्याची निवडणूकही भाजप ताकतीने लढेल असे बोलले जात होते.तशी तयारीही सुरू दिसत होती. मात्र या निवडणुकीत 'मनो-धैर्य' पुन्हा विस्कटले. प्रत्यक्षात मैदानात ३ पॅनेल उतरली अन सत्ताधाऱ्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.पण त्यामुळे भाजप अंतर्गत नेत्यांच्यात राजकीय तणाव वाढला. पण तो आता निवळत चाललेला पाहायला मिळतोय.
नुकताच कराड तालुक्यातील बनवडी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार मनोज घोरपडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ ही मंडळी एकाच व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेली दिसली.त्यानंतर शामगाव व पुसेसावळी येथील कार्यक्रमात सुध्दा हे सगळे एकाच व्यासपीठावर एकत्रित दिसले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्यात याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत.
एकमेकांवर केली होती टोकाची टीका ..
सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुक प्रचारात मुख्य विरोधकांच्या ऐवजी या भाजपच्या दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनीच एकमेकांवर टोकाची टीका केली होती. त्यानंतर अनेक कार्यक्रमात या नेत्यांचा अबोला कायम दिसला.त्यामुळे हे अंतर आता वाढत जाईल असे बोलले जात होते. पण सध्या तरी या कार्यक्रमातून हे चित्र बदलताना दिसत आहे .
राजकारणात कोणच कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे 'सह्याद्रीच्या निवडणुकीत भाजप अंतर्गत बदलले असले चित्र तरी ते होणारच नाहीत पुन्हा एकमेकांचे मित्र' असे म्हणता येणार नाही.आता तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूका समोर आहेत.त्यामुळे ही राजकीय गरज म्हणून ते एकत्रित दिसतात की हे चित्र वरवरचे आहे हे येणार्या काळात स्पष्ट होईलच.