तळमावले विभागात शेतीचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:24 IST2021-06-21T04:24:58+5:302021-06-21T04:24:58+5:30
पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा तालुका म्हणून पाटणची ओळख आहे. गत चार दिवसात तालुक्यामध्ये मोेठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसाने ...

तळमावले विभागात शेतीचे मोठे नुकसान
पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा तालुका म्हणून पाटणची ओळख आहे. गत चार दिवसात तालुक्यामध्ये मोेठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसाने तालुक्यातील शेती जलमय झाली आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. पिके वाहून गेली आहेत. तर काही ठिकाणी शेतातील पिकांबरोबर मातीदेखील वाहून गेली आहे. काही ठिकाणी शेतांचे रुपांतर तळ्यामध्ये झाले आहे. शेतातील पाण्याचा निचरा न झाल्यास पिकांचे आणखी नुकसान होणार आहे. १५ जूनपासून विभागात पावसाने सुरुवात केली. त्यानंतर सलग चार दिवस ढगफुटीसदृश पाऊस झाला. यापूर्वी जून महिन्यात एवढा पाऊस कधीही पडला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अजून काही दिवस पाऊस असाच राहिल्यास पिके हातची जाण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाची थोडी उघडीप मिळणे आवश्यक आहे. मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे विभागात बऱ्यापैकी पेरण्या पूर्ण झाल्या असून पावसाने उघडीप दिल्यास पिकांना पोषक वातावरण तयार होईल.
- चौकट
पावसामुळे शेतीची कामे ठप्प
तळमावले विभागात सध्या काही शेतकरी पेरणीच्या तर काही पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत; मात्र मुसळधार पावसामुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. जून महिन्यात झालेला प्रचंड पाऊस पिकांसाठी धोकादायक असून पेरण्यांची कामे पूर्ण होईपर्यंत पावसाने उघडीप देणे गरजेचे आहे.