Satara: महायुतीत अजून तिढा; आघाडीला कोडं सुटेना! 

By नितीन काळेल | Published: March 30, 2024 07:25 PM2024-03-30T19:25:58+5:302024-03-30T19:28:38+5:30

रणजितसिंह मोहिते फडणवीसांना भेटले; उत्तम जानकर यांची भूमिका काय?

Mahayuti, Opposition in Maha Vikas Aghadi, Disappointment drama and conflict continue In Madha Constituency | Satara: महायुतीत अजून तिढा; आघाडीला कोडं सुटेना! 

Satara: महायुतीत अजून तिढा; आघाडीला कोडं सुटेना! 

सातारा : माढा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर होऊनही नाराजीमुळे तिढा कायम आहे. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अनेकजण इच्छुक असलेतरीही उमेदवारी कोणाला द्यावी, याचे कोडे सुटलेले नाही. त्यामुळे माढ्याच्या रणांगणात युतीबाबततरी नाराजीनाट्य, विरोध आणि गाठीभेटी एेवढाच सिलसीला सुरू असल्याचे दिसत आहे.

माढा मतदारसंघाची आताची चाैथी निवडणूक ही इतर तीनपेक्षा वेगळी ठरलेली आहे. यापूर्वी निवडणुका झाल्या. पण, उमेदवारीवरुन आतासारखे कधीच गहजब झाले नाही. आताची निवडणूक महायुतीसाठी वेगळी ठरत आहे. तसेच महाविकास आघाडीसाठीही विचाराची झाली आहे. महायुतीतील भाजपने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली. पण, युतीतीलच रामराजे नाईक-निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांचा विरोध अजुन तसूभरही कमी झालेला नाही. त्यामुळे खासदारांना टेन्शनमध्ये राहण्याची वेळ आली आहे.

रामराजेंसह राष्ट्रवादीच्या सातारा जिल्ह्यातील गटाने तर माढ्याचा उमेदवार बदलाच असाच घोषा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लावलेला आहे. यासाठी रामराजेंनी पुन्हा अजित पवार यांचीही भेट घेतली. पण, चर्चेशिवाय पुढे काहीच झालेले नाही. तर भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यांची नाराजी आणि विरोधही मावळलेला नाही. फक्त ते संधीच्या शोधात आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी हातमिळवणी करुनही ते तुतारी वाजवू शकतात. पण, अजूनही त्यांना हिरवा कंदील दाखविण्यात आलेला नाही. तरीही धैर्यशील मोहिते यांच्या मतदारसंघात गाठीभेटी सुरूच आहेत. तर भाजपचे नेते मोहिते-पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: यामध्ये लक्ष घालत नाहीत, तोपर्यंत हा तिढा कायमच राहणार आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघात अजून पूर्णपणे लक्ष घातलेच नाही. राष्ट्रवादीचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी युतीतील नाराज मोहिते-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. पण, त्यातून पुढे काहीच झाले नाही. तरीही ही भेट घडविण्यामागे शरद पवार हेच असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यातच शरद पवार यांनीही माढ्यासाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे सांगितल्याने राजकीय खेळी करण्याचेच संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीचा उमदेवार हा महायुतीतील तिढा सुटत नाही तोपर्यंत जाहीर होणार नाही, असेच चित्र दिसत आहे.

रणजितसिंह मोहिते फडणवीसांना भेटले; उत्तम जानकर यांची भूमिका ठरणार !

माढ्यात महायुतीत अजून वाद कायम असून या पार्श्वभूमीवर भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. तर मोहिते यांचे माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर हे कट्टर विरोधक आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच मोहिते यांच्याशी जमवून घेण्याचे संकेत दिले होते.

मात्र, खासदार रणजितसिंह आणि आमदार जयकुमार गोरे यांनी मुंबईत फडणवीस यांच्याशी जानकर यांची भेट घडवली. जानकर यांना भेटीत खासदारांचे काम करण्याबाबत सांगण्यात आले. पण, जानकर यांनी आठ दिवसानंतर समऱ्थकांचा मेळावा घेऊन कळवतो, असे म्हटल्याची माहिती मिळत आहे. तरीही युतीतील हा गाठीभेटीचा सिलसीला कायमच असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Mahayuti, Opposition in Maha Vikas Aghadi, Disappointment drama and conflict continue In Madha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.